पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/18

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रशासक झपाट्याने कमी होत चालले आहेत. अनेक लेखांतून या संदर्भात मी परखड चिंतन मांडलं आहे. पण ते नाहीत असे नाही. किंबहुना सर्वदूर क्षेत्रात 'अनसंग हिरो' म्हणून ते वावरत असतात. त्यांच्या कामामुळेच आजही भारतीय प्रशासनाचा गाडा राजमार्गावर आहे, हे मी छातीठोकपणे सांगू शकतो. आज भारताची जी सर्व क्षेत्रात भरघोस प्रगती होते आहे त्यासाठी जसे द्रष्टे नेते, त्यांची विकासनीती कारणीभूत आहे; शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, उद्योजक, शेतकरी व कलावंताची जशी तपश्चर्या व योगदान आहे, तसंच खारीचा का होईना, प्रशासकांचा वाटा निश्चितच आहे. मी संशोधन करीत अभ्यासपूर्ण लिहिणारा खचितच नाही, तर अनुभव घेऊन ललित अंगानं लेखन करणारा प्रशासकीय लेखक आहे. एका अर्थानं माझा प्रशासननामा ही भारतीय प्रशासनाची बखर आहे. बखर हे जिवंत व ललित अंगानं जाणारं लिखाण असतं. माझ्या कथालेखमालेची जातकुळी तीच आहे. सांगायचा मुद्दा की, भारताच्या विकासात प्रशासनाचाही महत्त्वपूर्ण वाटा आहे. त्याचे ओझरते का होईना दर्शन या पुस्तकातून वाचकांना घडेल, असा विश्वास वाटतो.

 मी पदोन्नतीने भारतीय प्रशासनात येण्यापूर्वी उपजिल्हाधिकारी व अप्पर जिल्हाधिकारी/उपायुक्त या पदावर सुमारे सोळा-सतरा वर्षे महाराष्ट्राच्या आठ जिल्ह्यात काम केले आहे. त्या काळातील माझे प्रशासकीय अनुभव मी येथे मांडले आहेत. त्यातून गाव, तालुका व जिल्हा प्रशासनातील कर्मचारी व अधिका-यांच्या कामाचे, आव्हानाचे व विकास प्रशासनाच्या गुंतागुंतीचे दर्शन काही प्रमाणात का होईना, निश्चितच घडेल असा मी वाचकांना विश्वास देतो.

 या कथामालेतील चंद्रकांत हा 'मी' आहे, तर इनसायडर हो माझा अल्टर इगो' वा आतला आवाज आहे किंवा कधी कधी जागृत, छिद्रान्वेषी असं माझं मन आहे. नि:संकोच लिहिता यावे म्हणून 'इनसायडर' या टोपण नावाने वृत्तपत्रात लेखनं केलं. त्यामुळे लेखनाचा तोंडावळा हा विश्राम बेडेकरांच्या 'एक झाड व दोन पक्षी प्रमाणे काहीसा झाला आहे; पण मला जे सांगायचं होते, त्या आशयाच्या अंगाने वेगळे वळण घेत एक नवा लेखनफॉर्म मला गवसला असं म्हटलं तर अप्रस्तुत होणार नाही. हा नवा फॉर्म

सतरा