पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/175

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मी प्रायमाफेसी खालचा आदेश योग्य असल्यामुळे स्टे दिला नाही. म्हणून अप्पासाहेबांनी तक्रार केली आहे आणि त्याबाबत त्यांनी तुम्हाला मत द्यायला सांगितलं आहे."

 “ओ. के.', आता त्यांच्या इतर तक्रारींबाबत तुला काय म्हणायचं आहे?"

 “सर, अप्पासाहेबांनी अपील दाखल केलं ते पेशकारांकडे. माझ्याकडे ते सांगायला आले होते. त्यावेळी प्रथम आपल्या कामाचं काही न बोलता, तालुक्यातील तहसीलदार व प्रांत यांच्या पुरवठाविषयक तक्रारी सांगू लागले. विभागाचा पुरवठा आयुक्त म्हणून मला ते ऐकणं भाग होतं. तशात, ते माजी आमदार. शिष्टाचार म्हणून चहाही मागवला. पण जेव्हा त्यांनी अपीलाचं सांगितलं, तेव्हा त्यांना रीतसरपणे सुनावणी होईल असं सांगितलं. ते त्यांना कदाचित खटकलं असावं. दुपारी त्यांचे वकील आले, त्यांनी युक्तिवाद केला, पण मी ‘स्टे' दिला नाही. त्याची कारणं आदेशातही नमूद केली आहेत. मागच्या आठवड्यात अंतिम आदेश देऊन त्यांचं अपील मी फेटाळले."

 “पण त्यांनी असं तक्रारीत म्हटलं आहे की, त्यांचं दुकान बाजारपेठेत होतं. तिथं त्या रात्री झेड सिक्युरिटी असलेल्या एका मंत्र्याची जाहीर सभा होती म्हणून पोलिसांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव स्फोटक पदार्थ असल्यामुळे केरोसिनची दुकानातील व समोर कंपाऊंड वॉलमध्ये ठेवलेली बॅरल्स हटवायची सूचना केली होती. म्हणून त्यांनी भालकी रस्त्यावरील आपल्या शेतात ती हलवली आणि दुसऱ्या दिवशी नेमकी तहसीलदारांची तेथे धाड पडली. ती त्यांनी मुद्दाम, अप्पासाहेबांनी त्यांच्या भ्रष्टाचारी कारभाराची कलेक्टर व कमिशनरकडे तक्रार केली म्हणून, टाकली होती. पण ते निर्दोष होते. त्यांनी केरोसिनचा काळा बाजार केला नव्हता असं ते म्हणतात. त्याचा निकाल देताना विचार केला नाहीस का?"

 “सर, हा युक्तिवाद माझ्यापुढेही त्यांच्या वकिलांनी केला होता. पण त्याबाबत कसलाही लेखी पुरावा दिला नाही." चंद्रकांत म्हणाला, “मी प्रांतामार्फत स्वतंत्रपणे पोलिसांचा अहवाल घेतला आहे. त्या झेड सिक्युरिटी असलेल्या मंत्र्यांची सभा तहसीलदार धाडीनंतर तीन दिवसांनी त्या गावी झाली होती. हा पुरावा त्यातला खोटेपणा सिद्ध करतो निर्विवाद!"

 “ओ.के.," फाईल वाचून संपविल्यानंतर त्याला आश्वस्त करीत ठोंबरे म्हणाले, “आय ॲम कनव्हिन्स्ड... तू या प्रकरणात चूक केली नाहीस. मी आयुक्तांना माझं मत कळवीन."

 ""पण तरीही मनात खंत राहतेच. कुणीतरी तक्रार केली म्हणून, मनात किंतु

१७४ । प्रशासननामा