पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/170

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बदली प्रथम औरंगाबादला झाली. तिथं रूजू हो आणि तिथून पदमुक्त होऊन इथे ये. मग पाहू.' असा पवित्रा त्यांनी घेतला.

 मी गरजू होते. त्यांच्या सूचनेप्रमाणे तोही द्राविडी प्राणायम केला. आता त्यांनी नवा पेच समोर पेश केला. 'इथल्या मुख्य लिपिकांनी पद सोडू नये असा ग्रुपकमांडरांनी आदेशित केलं आहे, त्यामुळे इथं सध्या मुख्यलिपिकाचं पद रिक्त नाही. त्यामुळे ते कार्यमुक्त होईपर्यंत तुला हवं तर, वरिष्ठ लिपिक पदावर रूजू होता येईल.'

 मला त्यांची मनस्वी चीड आली. पदोन्नती मिळाल्यानंतर जुन्या, खालच्या पदावर, कोण काम करील? पण कुटुंबासाठी इथे रुजू होणं भाग होतं!

 मग मी ठामपणे निर्णय घेऊन त्यांना रूजू रिपोर्ट दिला. दररोज मस्टरवर सह्या करू लागले. दररोज ते स्वतः माझ्या नावापुढेच मुख्य लिपिक पदनाम मस्टरवर सोडून आपल्या अक्षरात वरिष्ठ लिपिक लिहित व नावाखाली टीप देत ‘मुख्य लिपिकाचे पद रिक्त नसल्यामुळे कनिष्ठ पदावर कार्यरत.' मी आठ दिवस हा प्रकार तुमच्या कार्यालयास व उपसंचालकांना लिहून दररोज कळवत होते.

 पुढे पार्वतीने 'अनफेअर लेबर प्रैक्टिस' च्या नावाखाली औद्योगिक न्यायालयात, तिला मुख्यलिपिक म्हणून काम करू देत नाहीत, म्हणून कर्नल वाघांविरुद्ध केस दाखल केली. परिणामी तिचा पगार त्यांनी बंद केला आणि एक महिन्याने मुख्यलिपिकाचे पद रिक्त नसल्यामुळे, ‘पार्वतीने उपसंचालक कार्यालयात रूजू व्हावे व नवीन पदस्थापनेचे आदेश घ्यावेत', असा आदेश काढून तिला कार्यालयातून एकतर्फी पदमुक्त केलं.

 उपसंचालकांनी त्यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न केले, पण त्यात ते सफल झाले नाहीत. कारण अकोल्याचे ग्रुपकमांड आणि कर्नल वाघ या प्रकरणात वृत्तपत्रातील बातमीमुळे आपली बदनामी झाली म्हणून तिच्यावर चिडले होते. त्यांनी कोणत्याही परिस्थितीत तिला त्या गावी रूजू करून घेणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले.

 औद्योगिक न्यायालयात खटला उभा राहिला, तेव्हा पार्वतीला पगार न मिळाल्याला दोन महिने झाले होते. म्हणून अंतरिम निकाल देत न्यायमूर्तीनी तिचे वेतन १५ दिवसात कोर्टात जमा करावे असे फर्माविले. आता उपसंचालकांपुढे चांगलाच पेच उभा राहिला. तिला वाघांनी एकतर्फी कार्यमुक्त केले असल्यामुळे तिथं पगार काढता येत नव्हता आणि पगार कोर्टात जमा केला नाही तर कोर्टाचा अपमान झाला असता; तेव्हा त्यांनी पुन्हा तिची बदली औरंगाबादला केली. बदलीच्या कारणात ही कारणे नमूद होती.

प्रशासननामा । १६९