पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/166

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



प्रशासनाची अनुदार पुरुषप्रवृत्ती/
स्त्री कर्मचा-यांवर कोसळते आपत्ती



 “मी आपणास प्रत्यक्ष भेटून विनंती केली नव्हती, तरीही आपण माझ्या कार्यालयीन प्रमुख असलेल्या त्या मगरुर एन.सी.सी.अधिकाऱ्यांना 'इनफ इज इनफ' अशा शब्दात समज देऊन त्यांना अपीलात जाण्यापासून परावृत्त केले व माझा मुख्यलिपिक पदी रुजू होण्याचा मार्ग प्रशस्त केला, त्याबद्दल तुमची मी आभारी आहे. आपल्यासारखे संवेदनाक्षम अधिकारी प्रशासनात फार थोडे असतात, म्हणून प्रोटोकॉल सोडून हे वैयक्तिक पत्र लिहीत आहे."

 चंद्रकांतने इनसायडरला ते पत्र देत म्हटले,

 "हे वाच मित्रा. ऑफ कोर्स, मी काही फार मोठा तीर मारला अशातला प्रकार नाही. पण गतवर्षी मी पुण्याच्या ‘यशदा' मध्ये 'जेंडर इश्यूज' वर एक कार्यशाळा केली होती, तिच्यात जे ग्रहण केलं, त्यानुसार त्या प्रकरणी पाठपुरावा केला, त्याचं हे पत्ररूपाने मिळालेलं फळ आहे."

  इनसायडरने ते पत्र वाचले. विदर्भातील 'राष्ट्रीय छात्र सेने'च्या एका महिला कर्मचाऱ्यावर प्रशासकीय अन्याय झाला होता. त्या संदर्भात चंद्रकांतने न भेटताही तिला नैतिक आधार दिला व तिच्या बाजूने प्रशासकीय अधिकार वापला. त्यामुळे दीड वर्षांच्या झुंजीनंतर तिला न्याय मिळाला. कृतज्ञतेने तिने ते पत्र लिहिले होते.

 अश्विनी म्हणाली, “भावोजी, या महिलेची हकीकत ऐकण्यासारखी आहे. हार न पत्करता, ठामपणे उभं राहून तिनं न्यायालयीन लढाई लढवली. तिला चंद्रकांतने मॉरल सपोर्ट दिला."

 पार्वती बेलदार वीस वर्षांपूर्वी एन.सी.सी. कार्यालयात कारकून म्हणून लागली. सुदैवाने तिचा नवरा त्याच तालुक्यात तहसील कार्यालयात तलाठी होता. दोघे कमावते व एकाच ठिकाणी नोकरी! पायघड्या उलगडाव्यात तसे सुखाचे जीवन तिच्यासाठी उलगडले गेले होते.

 दहा वर्षांनी ज्येष्ठतेनुसार तिला वरिष्ठ लिपिक म्हणून बढती मिळाली.

प्रशासननामा । १६५