पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/165

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 त्याचा परिणामही जाणवतो. शासनाच्या या योजना खऱ्या अर्थाने तळागाळापर्यंत पोचवायच्या असतील तर आजही ग्रामीण भागासाठी प्रवचन, भजन व कीर्तन हे प्रभावी माध्यम आहे. तू ते जाणीवपूर्वक आचरतोस आणि तुला ते यश मिळवून देते.

 मित्रा, आध्यात्मिकतेचा स्पर्श असलेला तुझा पॅटर्न ‘लखिना पॅटर्न' प्रमाणे पॅटर्न होऊ शकणार नाही. कारण, तुझी कार्यपद्धती तुझ्या जगण्यातून आली आहे. तिचे अधिष्ठान निष्काम कर्मयोग हे आहे. तडजोड न करता जनता जर्नादनरूपी परमेश्वराला शरण जात शासनाच्या योजना राबवणे, हे तुझ्या प्रशासनप्रणालीचे सार आहे, ते मलाही आचरणं शक्य नाही. कारण मी धर्म व अध्यात्मिकता यापासून बराच दूर आहे. मीही माझ्या पद्धतीने स्वधर्म पाळतो. पण तो नैतिक व सामाजिक जबाबदारीतून आलेले आहे, असं माझं मत आहे.

 भारतीय प्रशासनास बदनाम करणा-या त्रिसूत्रीबाबत सुरुवातीला मी मीमांसा केली आहे. त्यावर मात करता येणं, खरं तर, फार कठीण आहे अशातली बाब नाही.

 प्रत्येक अधिकाऱ्याने किमान 'व्यावसायिक नीतिमत्ता पाळून आपलं काम व्यवस्थित व वक्तशीर करीत जनतेला न्याय व संतोष देणं, अधिकाराचा वापर जनहितासाठी व अन्याय निवारणासाठी करणं; आणि लाच न घेणं' ही त्रिसूत्री हे त्याचं उत्तर आहे. माझ्या मित्रा, त्याच तू एक सच्चं उदाहरण आहेस. प्रशासननाम्याच्या माध्यमातून तुला वाचकांपुढे आणताना एकच समाधान वाटत आहे की, आमच्या प्रशासनात स्वधर्म आचरणारी, एक वारकरी वृत्तीची, संयमी तशीच पराक्रमी अधिकारी माऊली आहे.

 ज्ञानेश्वरांच्या शब्दात मी तुला शुभेच्छा देतो.

तुम्ही वृत्त नियम न करावे ।
शरीराते न पीडावे ।
दुरी केंही नवाचावे। तीर्थासी गा
देवतांतर न भजावे ।
हे सर्वथा काही न करावे ।
तुम्ही स्वधर्म यज्ञी यजावे ।
अनायासे
१६४ । प्रशासननामा