पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/16

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आहेत. त्यांच्याही जीवनात आशा-निराशांचे क्षण येतात, त्यांनाही पराकोटीची अगतिकता अनुभवावी लागते. तेही कुणाचे गुलाम असतात, त्यांनाही नको ते हुकूम व आदेश पाळावे लागतात. प्रसंगी स्वत:ची सद्सदविवेकबुद्धी मारूनही... हे सारं अनुभवविश्व अनोखं व रोमांचकारी आहे. तो ‘प्रशासननामा'चा अवकाश आहे.

 ‘प्रशासननामा' हे माझे सदर इ.स. २000 मध्ये 'दैनिक लोकमत' या मराठी दैनिकाच्या रविवारच्या पुरवणीतून पाक्षिक स्वरूपात वर्षभर प्रसिद्ध झालं. 'प्रशासननामा' ही माझा प्रशासकीय जीवनाचा एक प्रकारे सफरनामा होता. त्या निमित्ताने जिल्हास्तरावरील प्रशासन व नोकरशाहीचे स्वरूप मी कथा-लेखाच्या स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केला. त्यामागे 'लोकमत' च्या रविवारच्या पुरवणीचे तत्कालीन संपादक, साक्षेपी समीक्षक व माझे ज्येष्ठ सुहृद शंकर सारडा यांची प्रेरणा व आश्वासक प्रोत्साहन होते.

 वास्तविक वृत्तपत्रात स्तंभलेखनासाठी मोजकी जागा मिळते, पण माझे भाग्य की, मला शंकर सारडांनी जागेचे बंधन घातले नाही. त्यामुळे मला माझे अनुभव कोणत्याही बाह्य दडपणाविना मनमोकळे लिहिता आले. काही लेख, त्यातील अनुभवाचा आवाका पाहाता बरेच प्रदीर्घ होते. पण सारडांची गुणग्राहकता अशी की, त्यांनी ते काटछाट न करता छापले. असे भाग्य मोजक्याच लेखकांना मिळते. मी स्वत:ला माझ्या कुंडलीमधील ‘शंकर योगा' बद्दल धन्य-कृतार्थ समजतो.

 अगदी पहिल्या लेखापासून सर्वसामान्य वाचकांचा भरघोस प्रतिसाद व आश्वासक प्रतिक्रिया मिळत गेल्या. खरं तर, मनमोकळे आणि नि:संकोच लिहिता यावं व कुणाकडूनही दडपण येऊ नये म्हणून सदरची लेखमाला ही टोपणनावानं छापायची भूमिका मी व शंकर सारडांनी मिळून ठरवली होती. त्यामुळे थेट प्रतिक्रिया येण्यात अडथळा होता. पण प्रत्येक भेटीत शंकर सारडा त्यांच्यामार्फत पत्र, फोन वा प्रत्यक्ष भेटीतून मिळणाच्या वाचकांच्या प्रतिक्रिया सांगत मला म्हणायचे ‘तुमचे लेखन नेमकेपणानं वाचकांपर्यंत पोचत आहे. त्यांना ते अनुभव सच्चे व आपले वाटताहेत. त्यांच्या थेट मनापर्यंत ते भिडत आहेत. तुम्ही असंच लिहीत रहा.' ही उत्तेजना मला टॉनिकप्रमाणे स्फूर्तिदायी वाटायची आणि त्या भारावलेल्या

पंधरा