पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/152

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तर! आणि माझा चौकशी अहवाल व दिलेले संदर्भाच्या आधारे भाऊचं बेडा जंगम जातीचे प्रमाणपत्र नंतर जात प्रमाणपत्र पडताळणी पथकानं योग्य ठरवलं तेव्हा मला आनंद जरूर झाला. माझ्या नीरक्षीरविवेकी, निर्णय शक्तीवर शिक्कामोर्तब झालं! पण त्यावेळी कलेक्टरांनी माझ्याकडून केस काढून गेतली व उलटा निकाल अयोग्य हेतूने दिला. पुढे तो कायद्याच्या कसोटीला टिकला नाही, पण तोवर वेळ निघून गेली होती. भाऊचं कधीही भरून न येणारं नुकसान झालं होतं."

 "त्याहीपेक्षा चंद्रकांत, शहराचं जादा झालं. कारण शहरवासीयांना पुन्हा तेवढा चांगला नगराध्यक्ष मिळणं दुर्मीळच होतं! कलेक्टरांचं हे वर्तन हा प्रशासनावरील कलंक आहे. तहसीलदारसारख्या छोट्या अधिकाऱ्यानं योग्यरीतीने जातीचे प्रमाणपत्र द्यावं, पण कलेक्टरांसारख्या वरिष्ठानं अयोग्य हेतूने ते रद्द करावं ही प्रशासनाची दारुण म्हणावी अशी शोकांतिका आहे" इनसायडर म्हणाला.

 “या प्रकरणात माझं चांगलं सँडविच झालं होतं. एका बाजूला तो वजनदार नेता, जो मला अनेक बाबतीत सहकार्य करायचा, तो नाराज झाला व माझ्या नव्या कल्पना साकार करण्यासाठी मिळणारं राजकीय बळ संपलं. दुसऱ्या बाजूला मी कलेक्टरांच्या रोषाला पात्र झालो. कारण त्यांच्यावर टीकेची प्रचंड झोड वृत्तपत्रातून आली होती. त्यामागे मी असावा, असा त्यांचा अकारण ग्रह झाला होता. त्यामुळे मला त्यांच्याकडून अत्युत्कृष्ट सी.आर.(गोपनीय अहवाल शेरे) काही मिळाले नाहीत. त्यामुळे माझं आय.ए.एस. चे प्रमोशन वर्षभरानं लांबलं गेलं आणि नको तेवढा सेन्सेटिव्ह असल्यामुळे भाऊची आठवण आली, की प्रत्येकवेळी एक दारुण निराशा व पराकोटीची हतबलता जाणवते. आय गेट फ्रस्टेटेड टेंपरिली!” चंद्रकांत.

 “हो मित्रा! भाऊ आणि त्या प्रसंगामुळे तुझ्या नशिबात हे असं यायला नको होतं." इनसायडर म्हणाला, “मला मुकेशचं एक गीत आठवतं, वक्त करता जो वफाँ, आप हमारे होते... वेगळ्या संदर्भात म्हणावसं वाटतं, तू व भाऊ दोघांसाठी वक्त बेवफाँच निघाला."

 चंद्रकांत खिन्न हसला आणि तेच गीत गुणगुणू लागला, “वक्त करता जो वफाँ,"

प्रशासननामा । १५१