पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/148

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

भाऊचं जातीचे प्रमाणपत्र रद्द करावं अशी विनंती केली. त्याबाबत सविस्तर चौकशी करून निकाल द्यावा असं त्यांनी चंद्रकांतला आदेशित केले आणि चौकशी अंतिम टप्प्यात असताना आज त्या वजनदार नेत्याचा सकाळीच फोन आला होता.

 चंद्रकांतनं चौकशी सुरू केली, तसं प्रताप व भाऊने शहरातले नामांकित वकील त्यांच्या बाजू मांडण्यासाठी नियुक्त केले. त्यामुळे शहरात व जिल्ह्यात हे प्रकरण गाजू लागलं होतं. कारण भाऊचं इतर मागासवर्गीय जातीचे तहसीलदारानं दिलेलं प्रमाणपत्र रद्द होणं म्हणजे त्याचे नगराध्यक्षपद संपुष्टात येण्यासारखं होतं. भाऊला नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा होता. तसं प्रतापनं भाऊविरोधात वृत्तपत्राच्या माध्यमातून त्याच्या चारित्र्यहननाची मोहीमच उघडली होती. या गदारोळामुळे चंद्रकांतपुढे चौकशीच्या वेळी कितीही नाही म्हटलं तरी गर्दी व्हायची आणि त्याच्या दालनाबाहेरही कितीतरी अधिक लोक जमा व्हायचे. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात दोन्ही वकिलांनी काय पुरावे दिले आणि ते काय काय बोलले याची माहीती यायची. साऱ्यांच्या नजरा चंद्रकांत काय निर्णय घेतो याकडे होत्या.

 प्रतापच्या वकिलांनी भाऊनं शाळा-कॉलेजमध्ये कधीही जंगम बेडा असा आपल्या नावापुढे जातीचा उल्लेख केला नव्हता, याकडे लक्ष वेधीत म्हटलं, “आता केवळ जंगममधील बेडा ही उपजात इतर मागासवर्गात येते, या नव्या शासन निर्णयाचा राजकीय फायदा घेण्यासाठी भाऊनं तहसीलदारांच्या मदतीने खोटे प्रमाणपत्र मिळवलं हेच यामुळे सिद्ध होतं, भाऊ खरंच बेडा जंगम असेल तर शाळा-कॉलेजमधील नोंदीत तसा उल्लेख जरूर आला असता."

 भाऊचे वकील अत्यंत निष्णात होते. त्यांनी हाच मुद्दा धरून असा युक्तिवाद केला की ज्यावेळी भाऊ शाळाकॉलेजमध्ये होता तेव्हा इतर मागासवर्गात जंगम बेडा जात नव्हती. त्यामुळे त्यांनी केवळ वाणी हीच मुख्य जात लिहिली. पुन्हा आपण उच्च जातीचे आहोत हे दाखविण्याची यामागे प्रबळ पण मूलभूत भावना असणार. जेव्हा जंगम बेडा जातीबाबात शासन निर्णयाला व नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण आले, तेव्हा नगरसेवक असलेल्या भाऊने जातीचे प्रमाणपत्र मिळवले यात काय चूक आहे? वकिलांनी पुढे असेही दाखवून दिले, की ज्याकाळी जंगमबेडा ही इतर मागास जात नव्हती तेव्हाही त्याच्या काही नातेवाईकांनी वीस-पंचवीस वर्षांपूर्वी या जातीचे प्रमाणपत्र काढलं होतं. पुन्हा बेडा जंगम जातीचा इतिहास, धर्म, देव व परंपरेबाबत ज्ञानकोशाचा हवाला देत आणि त्यांच्या पुजाऱ्यांचे शपथपत्र दाखल करीत भाऊची जात जंगम बेडाच आहे, असं ठासून सांगितलं.

प्रशासननामा । १४७