पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/147

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 “सर, मी योग्य तोच निर्णय देईन याची खात्री बाळगा." आणि चंद्रकांतनं आपणहून फोन ठेवून दिला. त्याला आता त्या नेत्याचा राग आला होता आणि आपण या पद्धतीनं तो व्यक्त करण्याखेरीज काय करू शकतो या क्षणी? पण त्याच्या मनाला एक पीळ बसला गेला होता. आपला ज्ञानकोश व विश्वकोश अभ्यासात भाऊ हा त्या विशिष्ट जातीचा असणार, या पक्कं होत असलेल्या मताला अनपेक्षितपणे त्या वजनदार नेत्यानं भाऊ विरोधात मत व्यक्त केल्यामुळे दुजोरा मिळाला होता.

 गेली तीन वर्षे या जिल्ह्यात निवासी उपजिल्हाधिकारी असल्यामुळे चंद्रकांतचा भाऊशी चांगलाच संपर्क आला होता, त्याची नगरपालिकेतली नगरसेवक पदाची ही तिसरी टर्म होती व तो नुकताच नगराध्यक्षपदी बिनविरोध निवडून आला होता. कारण यंदाच्या वर्षी शहराचे नगराध्यक्षपद हे इतर मागासवर्गीयांसाठी राखीव होतं आणि भाऊनं तहसीलदाराकडून मिळालेलं जातीचे प्रमाणपत्र जोडून नगराध्यक्षपदाचा अर्ज भरला होता. विरोधीगटात कुणीही इतर मागासवर्गीय नगरसेवक नसल्यामुळे भाऊ बिनविरोध निवडून आला होता. आणि शहराचा प्रथम नागरिक बनला होता.

 चंद्रकांतनंही त्याचं अभिनंदन करताना म्हटलं होतं, “योग्य पदी सुयोग्य माणूस असणं हे तसं दुर्मीळ असतं. तुम्ही नगराध्यक्ष होणं हा असाच दुर्मीळ योग आहे, त्यामुळे तुमचं मनापासून अभिनंदन!"

 भाऊ हा अजातशत्रू वर्गातला लोकप्रतिनिधी होता. पु.लं.चा दुसरा नारायण होता. इतरांच्या सदैव उपयोगी पडणं हा त्याचा स्वभावधर्म होता. घरचा खाऊनपिऊन सुखी असलेल्या भाऊवर पंधरा वर्षात कधीही भ्रष्टाचार वा वाईट वागणुकीचे आरोप झाले नव्हते. त्याची एक वर्षाची कारकिर्द शहरासाठी लाभदायी ठरणार अशी चिन्हे दिसत होती. भाऊनं एकामागून एक लोकोपयोगी कामांचा धडाका लावला होता. सर्व अधिकाऱ्यांशी नम्रतेने वागत असल्यामुळे त्याच्या कित्येक योजनांना त्यांचं पूर्ण सहकार्य मिळत होतं.

 तो लोकप्रिय होणं म्हणजे पक्षातलं त्याचं स्थान अधिक मजबूत होणं, असा अर्थ काढून पुढील सार्वत्रिक निवडणुकीत त्याचाही आमदारकीसाठी विचार होऊ शकतो, या विचारानं अस्वस्थ झालेली काही स्वपक्षीय त्याच्याविरुद्ध गेली आणि त्यांना त्या वजनदार नेत्याचा आशीर्वाद व सक्रीय प्रोत्साहन मिळालं आणि भाऊनं दाखल केलेलं इतर मागासवर्गीय जातीचे प्रमाणपत्र हे बोगस व खोटं आहे; त्यानं तहसीलदाराला हाताशी धरून ते मिळवलं आहे, अशी कारणं देत विरोधी गटाच्या नगरसेवक प्रतापने जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला आणि

१४६ । प्रशासननामा