पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/145

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कल्चर फार कमी आहे आणि भावनांचे प्रकटीकरण करायचे असेल तर काम बंद केलं पाहिजे ही भ्रामक कल्पना रुजली आहे. मोठा नेता मरण पावला तर दोनतीन दिवस काम ठप्प होतात, त्यामुळे किती नुकसान होत समाजाचं, उत्पादकांचं, हे कुणी पाहत नाही. किती दिवस जनजीवन ठप्प होतं, यावर त्या मेलेल्या नेत्याचं मोठेपण मोजलं जातं, ही माझ्या मते सामाजिक विकृती आहे.'

 कलेक्टर चाकोरीबाह्य विचार करणाऱ्या पंथामधले होते. त्यामुळे त्यांचं मत त्याला साजेसं होतं. ते चंद्रकांतला अंतर्मुख करायला प्रवृत्त करीत होते.

 ‘त्या नेत्याचे काय वैयक्तिक हिशोब असतील याची मला माहिती नाही. पण त्याच्या टीकेतून हीच विकृत सामाजिक जाणीव व्यक्त होते. किल्लारीउमरग्याला भूकंप झाला म्हणून पूर्ण राज्यात इतर सर्वच्या सर्व काम ठप्प करायची? त्यामुळेच का त्यांच्याबद्दलची सहवेदना प्रकट होते ? त्यांना आपण तातडीने मदत पाठवली, रोख निधी जमा केला व आपल्या जिल्ह्यातील जनतेच्या मनातलं भूकंपाचं भय निघून जावं म्हणून साक्षरता अभियानाचा उपयोग करून घेतला आणि भूकंप मदतीबरोबर जिल्ह्यातील दैनंदिन कामकाजही सुरळीत ठेवलं. ऐन भरात आलेल्या साक्षरता अभियानाची गती आपण मंदावू दिली नाही. नाहीतर ती पुन्हा गतिमान करायला बराच वेळ लागला असता. संकट व आपत्तीच्या प्रसंगाला पुरेशा गांभीर्याने, भावनेचं प्रदर्शन न करता सामोरे जाण आणि आपलं काम धैर्यानं करणं हे समाजाच्या मोठेपणाचं लक्षण असतं! या प्रसंगानं आपण भारतीय माणसे किती छोटी आहोत हे दिसून आलं आहे. चंद्रकांत, ॲन्ड आय ॲम अशेम्ड फॉर द फॅक्ट देंट आय बिलाँग टु इट!'

१४४ । प्रशासननामा