पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/144

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

म्हणून मी स्वत:हून पत्रकारांशी बोलत नाही.'

 त्यामुळे चंद्रकांतचा निरुपाय झाला. तरीही नेत्यांच्या आक्षेपांचे खंडन व्हावे अशा तऱ्हेने बातम्या येतील याची व्यवस्था त्याने केली. क्रीडापटूच्या पथकप्रमुखानं औरंगाबादहून दिलेली प्रतिक्रिया दोन दिवसांनी वृत्तपत्रात आली.

 'भूकंपामुळे वातावरण सुन्न असताना कर्तव्यबुद्धीनं आमचं साधं पण गंभीर स्वागत कलेक्टरांनी करून आमच्या मार्गात ठिकठिकाणी जनतेला भूकंपनिधीस सढळ हातानं साहाय्य करावं हा संदेश देण्याची सूचना केली. त्यामुळे आम्हाला अंशमात्रानं का होईना सामाजिक जबाबदारी निभावता आली.'

 ही प्रतिक्रिया मुद्दामून छापवून आणली होती, तरी ती खरी होती. संतोष सिंगांनी खरोखरच क्रीडापटूना तशी सूचना केली होती. त्या प्रतिक्रियेनं नेत्यांच्या त्या विधानाला परस्पर चांगल्यापैकी काटशह दिला गेला होता.

 भूकंप झाल्यावर सकाळी चंद्रकांतनं कलेक्टरांच्या सल्ल्याने जिल्हा पुरवठा अधिकारी व तहसीलदारांमार्फत पाच ट्रक धान्य, कपडे व बिस्कीट, ब्रेड, केळी इ. साहित्य मदतरूपाने जमा करून तातडीने किल्लारीला पाठवले होते. आज जिल्हा पुरवठा अधिकारी परत आले होते. त्यांना गाठून पत्रकारांनी किल्लारीची अद्ययावत बातमी घ्यावी असं चंद्रकांतनं सुचवून, अनौपचारिक वार्ता परिषद घडवून आणली. तेव्हा जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणाले,

 ‘किल्लारीला सर्वप्रथम धान्य व वस्तू घेऊन मीच पोचलो होतो. आमच्या जिल्ह्याच्या मदतीमुळे दोन दिवस सुमारे आठ गावांना धान्य पुरवता आलं व गरम कपड्यांनीही त्यांच्या थंडीची सोय झाली. बाकी मदतीचा ओघ दोन-तीन दिवसांनी सुरू झाला. पण सर्वात प्रथम आपण मदत पोचवू शकलो याचं समाधान वाटतं.'

 चंद्रकांतनं पुढे म्हटलं, 'आणि ३० सप्टेंबर व १ ऑक्टोबर या दोन दिवसात व्यापारी व जनतेच्या मदतीने एक लाख रुपये मदतीप्रीत्यर्थ शहरातून जमा केले व मुख्यमंत्री निधीला आपण दिले. प्रत्येक तालुक्यातून अशा तऱ्हेने रोख मदत जमा करण्याचे काम सुरू झालं आहे. विभागीय आयुक्तांनी इतर सर्व जिल्ह्यांना आमच्याप्रमाणे काम करावं असं सूचित केलं आहे.'

 दुसऱ्या दिवशी सर्व वृत्तपत्रात या बातम्यांना व्यापक प्रसिद्धी मिळाली. संतोष सिंग चंद्रकांतला म्हणाले, 'हे तुझंच काम असणार. पण, त्यामुळे त्या नेत्यांचे आरोप किती खोटे होते हे वाचकांना कळून आलं असेल.'

 'थँक यू, सर!'

 ‘पण चंद्रकांत, या प्रकरणाचा मी बराच विचार केला आहे. भारतीयांत वर्क

प्रशासननामा । १४३