पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/143

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 चार वाजता चंद्रकांतची कलेक्टरांशी भेट झाली, तेव्हा चंद्रकांतने हा विषय काढला.

 ‘तद्दन मूर्ख व खोट्या विपर्यस्त टीकेला उत्तर देण्यापेक्षा अनुल्लेखाने मारलेले व दुर्लक्ष केलेले बरे!' कलेक्टर म्हणाले.

 ‘त्याचा तुमच्या प्रतिमेवर अकारण विपरीत परिणाम होण्याची भीती वाटते. चंद्रकांत म्हणाला.

 ‘नेत्यांनी दुसऱ्यांदा सरळ प्रेस कॉन्फरन्स घेऊन टीका केली आहे; त्यामुळे मला वाटतं...'

 'ठीक आहे. लेट मी थिंक.' कलेक्टरांनी म्हटलं.

 तेव्हा चंद्रकांतने ओळखलं की त्यांना हा विचार पसंत पडलेला नाही.

 संतोष सिंगच्या या कृती व वृत्तीमागे एक विचार होता. 'ब्युरोक्रसी शुड बी फेसलेस! आपण शासनाचे पेड़ सर्व्हन्टस् आहोत. शासनाने आखलेल्या धोरणांची प्रामाणिकपणे अंमलबजावणी करणं आपलं काम आहे... त्यासाठी प्रसिद्धी नको.'

 कलेक्टर चंद्रकांतशी मैत्रीच्या नात्याने वागत असत, त्यामुळे चंद्रकांत अनेकदा चर्चेत असहमती दर्शवीत आपली मते मांडायचा. त्याला संतोष सिंगनी कधी हरकत घेतली नव्हती. त्यामुळे या संदर्भातही चंद्रकांतने आपले मत त्यांच्या नाराजीची पर्वा न करता नोंदवत म्हटले, 'ब्रिटिश काळात हे धोरण कदाचित योग्य असेल, पण आजचा जमाना हा विकास प्रशासनाचा आहे सर. लोकप्रतिनिधी जरी धोरण आखत असले तरी त्यात वरिष्ठ सचिवस्तरीय अधिकाऱ्यांचा सहभाग असतो. नियम-कायदे-योजना करण्यात त्यांची मदत होत असते. मुख्य म्हणजे, अंमलबजावणीची पूर्ण जबाबदारी अधिकाऱ्यावर असते; त्यामुळे त्यांना पूर्णतः फेसलेस राहून चालत नाही. नाहीतर नागरिकाचे गैरसमज वाढीस लागतात. अधिकाऱ्यांनी प्रसिद्धीच्या मागे लागू नये, हे ठीक. तरी चांगली व कठोर जनहिताची कामे करायची असतील तर अधिकाऱ्यामागं जनमताचं पाठबळ आवश्यक ठरतं. त्यासाठी त्याची तशी इमेज असायला हवी. ती निर्माण होते प्रसिद्धी माध्यमामुळे! आपण 'पब्लिसिटी हंग्री' राहू नये, तसंच ‘पब्लिसिटी शाय' पण राहू नये. योग्य कामाची योग्य प्रसिद्धी हवीच. तर अधिका-यांना काम करायला सुलभ जातं.'

 'तू म्हणतोस ते मला नवं नाही. किंबहुना ते खरं आहे. संतोष सिंग म्हणाले, पण माझा स्वभाव वेगळा आहे. मला आपणहून टिमकी वाजवता येत नाही आणि मीडिया नेहमी सेन्सेशनल बातमीत रस घेतो, याची मला राग येतो.

१४२ । प्रशासननामा