पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/142

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 ‘आता मात्र प्रशासनाच्या बेपर्वाईचा कळस झाला आहे. भूकंप पुनर्वसन हा या घडीचा महत्त्वाचा प्रश्न आहे. पण, त्याकडे दुर्लक्ष होत आहे आणि साक्षरता अभियान, राष्ट्रीय खेळ स्पर्धेच्या धावक पथकांचे स्वागत या सारख्या गोष्टीत कलेक्टर रस घेत आहेत. आणि हे मुद्दाम, माझ्या पहिल्या प्रतिक्रियेमुळे चिडून जाऊन होत आहे. असा माझा आरोप आहे.'

 अर्थात हे खरं नव्हतं. थोड्याशा खऱ्याला मीठमसाला लावून या नेत्याने टीका केली होती.

 भूकंप झाला त्यादिवशी सायंकाळी पाच वाजता शहरात १५ जिल्हे व हजार किलोमीटर दौड करून खेळाडूंचे पथक आले होते. त्याचे कलेक्टर, पोलीस अधीक्षक इत्यादींनी स्वागत केले होते, यावेळी चंद्रकांतही उपस्थित होता.

 १९९४ साली महाराष्ट्राला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे यजमानपद मिळाले होते. त्या निमित्ताने पुण्यात बालेवाडी येथे अद्ययावत क्रीडा संकुल उभारण्याचा शासनाने निर्णय घेतला होता. बांधकामही पूर्ण होत आले होते. त्यासाठी वातावरणनिर्मिती व्हावी म्हणून सप्टेंबर-ऑक्टोबर ९३ मध्ये काही खेळाडूचे एक पथक महाराष्ट्रभर दौड करीत होते. ते नेमके भूकंपाच्या दिवशी आले.

 जिल्ह्यात रात्री मुक्काम करून सकाळी औरंगाबादकडे रवाना होणार होते. त्यासाठी पंधरा दिवसांपूर्वी बैठक झाली होती. कलेक्टर हे क्रीडाप्रेमी व स्वत: खेळाडू असल्यामुळे त्यांनी खेळाडूंच्या पथकाचे शहराच्या सीमेवर स्वागत करावं व शहरातील क्रीडाप्रेमी नागरिकांनी त्यांच्यासोबत दौड करून, वाजतगाजत स्टेड्यिमला क्रीडा ज्योत आणावी व रात्री नगरपालिकेने भोजन द्यावे असं कार्यक्रम ठरविला होता.

 बैठकीत ठरल्याप्रमाणे खेळाडूंच्या स्वागतासाठी शहराच्या सीमेवर एक कमान व ठिकठिकाणी पोस्टर्स लावून वातावरण निर्मिती करण्यात आली होती.

 पण पहाटेच भूकंपाची दुर्घटना झाली होती. त्याची भीषणता लक्षात घेऊन, बाकी सर्व सोहळा रद्द करून, केवळ खेळाडूचे साधे स्वागत करावे व त्यांना निरोप द्यावा असे कलेक्टरांनी ठरविले. कमानी आधीच उभारल्या होत्या व पोस्टर्सही लावण्यात आली होती. त्याला उद्देशून त्या नेत्याने असत्याच्या वेष्टणात लपेटून जनतेपुढे पेश केलं होतं. त्यांच्या परमिट रूमला ती शाळेच्या जवळ असल्यामुळे कलेक्टरांनी परवानगी नाकारली होती, त्याबद्दलचा राग होता. यावेळी मोठ्या चतुराईने त्यांनी जनतेच्या भावनेला हात घालणारा मुद्दा मिळताच त्याचे भांडवल करून, कलेक्टर हे असंवेदनाक्षम आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केला होता.

प्रशासननामा । १४१