पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/131

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 "त्याहीपेक्षा, त्यामुळे अटक व न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागलेले लोक अधिक जातीयवादी होत जातात. त्यामुळे मराठवाडा नामांतर प्रकरणाच्या निमित्तानं दलितांची घरे जाळणे इ. सूडाचे प्रकार घडून आले. त्यांना नामांतराच्या प्रश्नाआड आपले हिशेब चुकते करायची संधी मिळाली. त्यामुळे दोन समाजातील दरी अधिक रुंद झाली. आताशी कुठे ते घाव भरून निघताहेत. एकेकाळी टिळक-आगरकरांचा आणि राजकीय स्वातंत्र्य की सामाजिक सुधारणा हा वाद गाजला होता. त्यावेळेचं आगरकरांचं द्रष्टेपण आज जाणवतं."

 “त्याहीपेक्षा न्यायमूर्ती रानडे यांचे मोठेपण मला जाणवतं." चंद्रकांत म्हणाला,

 “न्यायमूर्तीनी एकाचवेळी राजकीय, सामाजिक, आर्थिक व नैतिक सुधारणेवर भर दिला होता. कारण सामाजिक मागसलेपणात व जातीयतेत जसे राजकीय व सामाजिक प्रश्न असतात. तसेच आर्थिक व विवेकाधिष्ठित नैतिक प्रश्नही असतात. या चारही अंगांनी एकाच वेळी समान गतीने सुधारणा होणे गरजेचे आहे. तरच असे पेच सोडविले जाऊ शकतात.

 “आपली घटना सेक्युलर व समतावादी आहे. ती बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला दिलेली फार मोठी देणगी आहे. जातीयता व धर्मांधता जेव्हा पूर्णपणे नाहीशी होईल, तेव्हाच बाबासाहेबांच्या आत्म्यास समाधान लाभेल. पण हा दिवस केव्हा येणार?"

 चंद्रकांतचा निरोप घेत इनसायडर एवढेच म्हणाला, “आपल्या या सामाजिक परिस्थितीला अनुसरून अनेकजण 'जातीची' जी व्याख्या करतात ती कितीही विदारक असली तरी ख़री आहे. 'जात नाही ती जात.'

१३0 । प्रशासननामा