पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/12

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



मनोगत





 पुस्तकाच्या सुरुवातीला मी 'इंडियन स्टॅट्युटरी कमिशनच्या' अध्यक्षांनी १९३0 साली भारतीय घटना व दुरुस्ती सुधाराबाबतच्या अहवालात लिहून ठेवलेलं एक मार्मिक विधान उद्धृत केलं आहे, ते म्हणजे "Of no country can it be said more aptly and truly of India that "Government is administration.'

 ‘प्रशासननामा' च्या लेखनामागे हे विधान किती व कसे यथार्थ आहे याचा वेध घेण्याचा हा एक प्रामाणिक व अनुभवसिद्ध प्रयत्न आहे.

 भारतीय प्रशासन व्यवस्थेचा इतिहास जरी प्राचीन असला तरी ब्रिटिश कालखंडातच खऱ्या अर्थाने आधुनिक नोकरशाहीचा - इंडियन ब्युरोक्रसीचा जन्म झाला व ती दृढमूल झाली असं मानलं जातं. अवघ्या हजारभर आय.सी.एस. अधिकाऱ्यांच्या बळावर ब्रिटिशांनी भारतासारख्या प्रचंड देशाचा राज्यकारभार दीडशे वर्षे सांभाळला हे एक नवल आहे. जरी त्यांचा हेतू ब्रिटिशांचे हितरक्षण व जास्तीत जास्त लूट भारतात करून ब्रिटन संपन्न करणे असला तरी तत्पूर्वी मुघल सत्ता संपुष्टात आल्यावर जे पाच-साडेपाचशे संस्थानिक राज्यकारभार करीत होते, तेथे केवळ (कांही सन्माननीय अपवाद वगळता) अराजकच होते. त्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था, आधुनिक इंग्रजी शिक्षण, कायद्याचं राज्य, पोस्ट, रेल्वे सारख्या सुविधा आणि जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकमार्फत जिल्हा प्रशासन यामुळे भारतीय जनतेला ब्रिटिश राज्य, पारतंत्र्याचं दुःख असूनही सुसह्य वाटत होतं. यामध्ये ब्युरोक्रसीचा फार मोठा हात होता हे निर्विवाद सत्य आहे. म्हणूनच स्वतंत्र भारतातहीं नोकरशाहीचा ढाचा फारसा बदलला नाही.

अकरा