पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/112

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ॲडमिनिस्ट्रेशनचा प्रोग्राम पाहून आलो. महाराष्ट्र, आंध्र व कर्नाटक राज्यात प्रशासन व्यवस्थेत ई-गव्हर्नन्सचे प्रयोग सुरू आहेत. ते जर मार्गी लागले तर निश्चितच तुझं कागदविरहित मंत्रालय पाहण्याचं स्वप्न साकार होईल!"

 चंद्रकांत ज्या कंपनीत जाऊन आला होता तिचा व्याप मोठा आहे. शंभरावर कार्यालयीन कर्मचारी आहेत. कारखान्यात पाच हजारावर लोक आहेत. नव्या व्यवस्थापकीय संचालकांनी कार्यालयीन कामकाज जलद गतीनं व्हावं म्हणून एक अभिनव प्रयोग केला. एके सकाळी कर्मचारी आपापल्याजागी येऊन स्थानापन्न झाले तेव्हा प्रत्येकाच्या टेबलावर एक पत्र होतं. 'आजपासून बरोबर तीन महिन्यांनी तुमच्या टेबलावर पी.सी. असेल व त्यानंतर एक महिन्याने तुमच्याजवळ एकही फाईल असणार नाही. सर्व कामकाज संगणकावर करायचे आहे. तीन महिन्यात ऑफिस ऑटोमेशनचा प्रत्येकाने कोर्स पूर्ण करावा. आपली फी कंपनी भरेल.' चंद्रकांत तेथे पाच महिन्यांनी गेला होता, तेव्हा तेथे सर्वत्र संगणक दिसून आले. कागद व फायली नसल्यामुळे ते कार्यालय किती प्रसन्न वाटत होते!

 कागद सांभाळण्याची, कागदाला कागद लावण्याची आणि प्रत्येक नवा संदर्भ आला की नवी फाईल तयार करण्याची खास सरकारी वृत्ती व त्यामुळे दृढ झालेली वेळकाढू आणि संवेदनशून्य प्रशासनशैली बदलल्याखेरीज सामान्य माणसाला न्याय मिळणार नाही, त्याचे काम वेळेवर होणार नाही.

 चंद्रकांतने मला या दफ्तर दिरंगाईच्या अनिष्ट परिणामाचे अनेक किस्से सांगितले आहेत. किस्से कसले? विदारक, अस्वस्थ करणारे अनुभवच! त्यापैकी येथे एक सांगावासा वाटतो.

 पंधरा वर्षांपूर्वीचा हा प्रसंग आहे. प्रोबेशन संपवून चंद्रकांत एका विभागाचा प्रांत अधिकारी झाला होता. त्याच्यासमोर एके दिवशी एक रजिस्टर पत्र आले.

 "गेली चोवीस वर्षे मी सातत्यानं पत्रव्यवहार करत आहे. माझं क्षुल्लक कारणासाठी केलेलं निलंबन रद्द करून मला तलाठीपद पूर्ववत बहाल करावे या मागणीसाठी. येत्या पंधरा ऑगस्टपर्यंत काही निर्णय लागला नाही, तर मी आपल्या कार्यालयासमोर जाहीरपणे स्वत:ला पेटवून घेऊन आत्मदहन करीन.

 आपला, कुलकर्णी, निलंबित तलाठी."

 चंद्रकांतनं शिरस्तेदाराला बोलावून तलाठी कुलकण्र्यांची फाईल मागवली. चार-दोन किलो वजनाची, धुळकटलेली, जीर्ण पिवळ्या कागदांची फाईल समोर आली, तेव्हा त्याच्या कपाळावर आठ्यांची जाळी उमटली. तेव्हा शिरस्तेदार म्हणाले,

 "सर, आपण परेशान होऊ नका. नवा प्रांत ऑफिसर आला, की या

प्रशासननामा । १११