पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/111

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



आम्ही कागदाचे स्वामी



आम्ही कागदाचे स्वामी । कागदावर राज्य करतो
कागद सांभाळीत जगतो । सुखेनैव "

 या इनसायडरचे एक स्वप्न आहे. मंत्रालयात जायची पाळी आपल्यावर कधी ना कधी आली असेल. किमानपक्षी, गेला असाल तर तहसील-पंचायत समिती किंवा जिल्हा स्तरावरील कलेक्टर कचेरी, जिल्हा परिषद वा तत्सम कार्यालय पाहायचा नक्कीच प्रसंग आला असेल. तिथं तुम्हाला काय वाटतं? कागदांचे आणि फाईलीचे प्रचंड गठ्ठे आणि टेबलावर त्यांच्या रचलेल्या राशी. इतक्या, की टेबलामागचा कर्मचारी कधीकधी दिसत नाही. अगदी आजच्या संगणकाच्या जमान्यातही अजून पेपरलेस ऑफिस दिसून येत नाही. त्यामुळे तुमच्याशी संबंधित प्रकरण वा फाइल संदर्भ देऊनही सापडत नाही किंवा खालीवर पत्रव्यवहार चालू असतो. तुमचं काम होत नाही, एवढंच तुम्हाला भेटीत कळतं. तुमची फाईल पुन्हा सुदैवानं सापडलीच तर ती अधिक वजनदार झालेली असते. कारण तिच्यात चार-दोन कागदांची, पत्रव्यवहाराच्या प्रतींची भर पडलेली असतेच. पण तुमचं काम ? छे, ते अजूनही दूरवर पळणारं मृगजळच असतं.

 या इनसायडरचं स्वप्न आहे की, मंत्रालय, कलेक्टर ऑफिस वा जिल्हा परिषद यांनी आधुनिक संगणकयुगात प्रवेश करावा आणि माऊस क्लिक करून क्षणार्धात तुमच्या कामाची, प्रकरणाची सद्य:स्थिती सांगावी. कुठेही कागदाचा व फायलिंगचा ढीग दिसू नये. ज्या कामाला पूर्वी महिना लागत असे ते काम मिनिटात व्हावे. हे स्वप्न मी चंद्रकांतला कितीवेळा तरी सांगितलं आहे. प्रत्येक वेळी तो उपरोधिक हसत म्हणत असतो,

आम्ही कागदाचे स्वामी । कागदावर राज्य करतो
कागद सांभाळीत जगतो । सुखेनैव

 पण परवा भेटला तेव्हा उत्तेजित व हर्षभरित स्वरात तो मला म्हणाला, “मित्रा, मी आजच एका खाजगी कार्यालयात जाऊन आलो आहे. त्यांच्या ई-

११० । प्रशासननामा