पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/109

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 पैसाही अपहार होणार नाही, ही वेळ प्रेताच्या टाळूवरील लोणी खायची नाही. आपण सारी माणसं आहोत व हे काम योग्य तव्हेने केलं तर लोकांचा लाखमोलाचा दुवा मिळणार आहे."

 चंद्रकांतच्या त्या अनोख्या, स्पष्ट पण भावनात्मक आवाहनाने भारावून जाऊन त्यांनी वचन दिले.

 “थँक्यू ऑल ऑफ यू! माझी हीच अपेक्षा होती. आता मी दोन दिवसात मदत वाटपाचा चाकोरीबाहेरचा मार्ग सांगतो. माझ्यावर नियंत्रक अधिकारी म्हणून फार मोठी जबाबदारी आहे. रिस्क आहे, पण ती तुमच्या विश्वासावर घेत आहे."

 क्षणभर थांबून चंद्रकांतने आपला बेत विशद केला.

 “मी तुम्हा सर्वांना अंदाजाने किती मदत करावी लागेल याचा हिशोब लावून रोख रक्कम देतो. सोबत ॲक्वेन्टन्स रोल देतो. तुम्ही तीन दिवसात तीन गावी जा. बसंन, पायी वा बैलगाडीनं. सर्व घरांची पाहणी पाचपंचवीस जणांच्या सोबत करा. खराखुरा पंचनामा करा आणि पूरग्रस्तांची यादी तयार करून ती सर्व गावकऱ्यांसमोर वाचून दाखवा. नेहमी पंचनाम्यावर चारपाच जणांची सही असते यावेळी उपस्थित जे पन्नाससाठ गावकरी असतील त्या सर्व गावकऱ्यांच्या सह्या घ्या. प्रत्येक कुटुंबाचे नाव, घरातील माणसांची संख्या व त्याला देय असलेली रोख मदत जाहीर करा. त्यांचा काही आक्षेप नसेल तर सर्वांसमक्ष तिचे वाटप करा.

 “एखादं घर पूरग्रस्त झालेलं नाही वा घरात माणसांची संख्या फुगवून सांगितली आहे असा आक्षेप वा तक्रार, पंचनाम्याचे जाहीर वाचन होताना आली तर तिची पुन्हा शहानिशा करा. खात्री करून त्याबाबत निर्णय घ्या. घरनिहाय किती रोख मदत वाटप करायची हे ठरवा आणि त्याचं, त्याच दिवशी रात्री रोख मदतीचं-खावटीचे वाटप करा. तुम्ही परतल्यावर कागदपत्रांवर सह्या करून ही रिस्क मी तुमच्या भरवशावर घ्यायला तयार आहे. शेवटी पंचनामा तुमचाच असणार आहे आणि काही गैरप्रकार झाला तर पहिली जबाबदारी तुमचीच असणार आहे. पण तुमच्या बरोबरीनं मलाही चौकशीला सामोरं जावं लागेल. पण पूरग्रस्तांची दयनीय अवस्था व मदतीची तातडी पाहता मी माझी करिअर पणाला लावायला तयार आहे."

 एकाच महिन्यापूर्वी आलेल्या चंद्रकांतचं धाडस व तळमळ पाहून सर्व कर्मचारी थक्क झाले होते.

 बैठकीच्या शेवटी एकमुखानं योग्य रीतीनं सर्वेक्षण करून मदत वाटप केली जाईल असे आश्वासन सर्वांनी चंद्रकांतला दिलं.

१0८ । प्रशासननामा