पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/103

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जनताभिमुख असणं आणि त्यांच्याबद्दल जनतेत विश्वास असणे हेही महत्त्वाचं आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत हिंसक, बेकाबू झालेल्या जमावापासून पोलीस इन्स्पेक्टरला एस.एम.जोशींनी मिठी मारून वाचवलं. हा प्रसंग अनेक वाचकांना माहीत असेल. इथे हे लक्षात घ्यावं लागेल, की एस.एम.जोशी हे सर्वांना आदरस्थानी वाटणारे सत्त्वशील असे लोकनेते होते. ते मध्ये पडल्यानंतर हिंसक जमाव शांत झाला. त्यापूर्वी नौखालीमध्ये पूर्ण सैन्य जे करू शकले नाही ते महात्मा गांधींनी (माउंटबॅटनच्या शब्दात ‘वन मॅन आर्मी'नं) दाखवलं आणि हिंदु-मुस्लीम दंगलींना काबूत आणून शांतता प्रस्थापित केली. दंडाधिकारी व पोलीस अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रात जनताभिमुख वृत्तीनं आपल्याबद्दल विश्वास निर्माण केला पाहिजे; तरच अशी तणावांच्या प्रसंगी जनता त्यांना प्रतिसाद देऊ शकते.

एकूणच, गर्दीचं मानसशास्त्र ही अभ्यासानं आणि अनुभवानं आत्मसात करण्याची गोष्ट आहे. त्याची ‘बॉटमलाईन' ही अर्थातच, माणसाचं मन पुस्तकासारखं वाचण्याची कला अंगी बाणवणं ही आहे.

१०२ । प्रशासननामा