पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/10

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अधिकाऱ्याला धारेवर धरले जाते, याचा अनुभव बहुसंख्य अधिकाऱ्यांना नेहमीच येतो. काही वेळा माध्यमे एखाद्या अधिकाऱ्याला वारेमाप प्रसिद्धी देऊन त्याची ‘या सम हाच' अशी प्रतिमा उभी करतात, परंतु ती प्रतिमा अवास्तव असू शकते. काही वेळा कर्तव्यदक्ष आणि मेहनती, प्रामाणिक अधिकाऱ्यावर वरिष्ठांची निष्कारण खप्पा मर्जी होऊ शकते. प्रशासकीय अधिकारी कोणकोणत्या मर्यादा पाळून आणि कोणकोणत्या ताणतणावांखाली काम करतो याची यथार्थ कल्पना वाचकांना देण्याचे मोठे कार्य लक्ष्मीकांत देशमुखांनी 'प्रशासननामा' ह्या लेखमालेद्वारे केले, हे नि:संशय. त्याकरता तरी प्रशासनातील त्यांचे सहकारी त्यांचे सदैव ऋणी राहतील.

 सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्यांच्या लेखनात अभिनिवेश किंवा पक्षपात यांचा लवलेशही आढळत नाही. त्यांच्या संवेदनशील मनाला भिडलेल्या किंवा 'कलात्मक तटस्थता' भंगणार नाही याचे पूर्ण भान राखूनच, त्यामुळे अनुभवातून आलेले इनसाईट कागदावर उतरवताना, त्यांचा कुठेही तोल ढळलेला नाही हे विशषत्वाने जाणवते.

 जीवनाच्या हरेक क्षेत्रात, अनेक बरेवाईट अनुभव आपल्या सर्वांनाच येतात. त्या त्या वेळी आपण कधी प्रक्षुब्ध होतो, कधी हळहळतो, कधी सुखावतो तर कधी सुन्न होऊन जातो. अशा तात्कालिक भावना बाजूला सारून, त्या मूळ अनुभवाचे शांत चित्ताने विश्लेषण करण्याची आपली तयारी किंवा कुवत नसते. समजा असे चिंतन केलेच, तरी ते नेटक्या शब्दांत मांडणे फार थोड्या जणांना जमते. त्यासाठी आवश्यक ती प्रगल्भता, चिंतनशील प्रवृत्ती आणि शब्दांकनाची हातोटी हे सर्व घटक पदार्थ एकत्र आल्यामुळेच, 'प्रशासननामा'सारखे लज्जतदार पक्वान्न वाचकांच्या ताटात पडले आहे. व्यक्तिगत अनुभूतीचे सार्वत्रिकीकरण करणारी साहित्यकृती श्रेष्ठ मानली जाते. त्या कसोटीवर हे पुस्तक नक्कीच खरे उतरावे.

 प्रशासनाचे प्रश्न मूलतः सामाजिक प्रश्नातूनच उद्भवलेले असतात. केवळ लोकशाही शासनप्रणाली अवलंबली, कायदे केले, प्रशासकीय यंत्रणा उभी केली, कायद्याचे राज्य आणले की आपोआप

नऊ