पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/94

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

चिकित्सक होणं कठीण जातं. मग तो शब्दांचा छंद विकसित करीत कविता वर्णनाच्या अंगांनी समजावत राहतो. अलीकडे वृत्तपत्रांत परीक्षणाऐवजी परिचयास महत्त्व येते आहे. समीक्षेपेक्षा सौंदर्यस्थळे खुलविणे मग अनिवार्य होते. या सर्वांत समीक्षा एकांगी होण्याचा जो धोका असतो, तो ‘आस्वादाची काही पाने'मध्ये प्रकर्षाने जाणवतो. वर्णनामागे लागत आपण गुणसाधना करतो. दोषांवर बोट ठेवायला कविता नुसती वाचून चालत नाही. तिची चिकित्सा, विश्लेषण, विचार, शिल्प, रस, संगीत अशा अंगांनी करीत दोषदिग्दर्शन व्हायला हवे. समीक्षकांचे कार्य वाचकांच्या साहित्यजाणिवा प्रगल्भ करण्याचेही असते, हे विसरून चालणार नाही. कविता केवळ आस्वादक नसते, तर तिचा पैल हा भविष्यवेधी असतो. त्याची उकलही तितकीच आवश्यक गोष्ट असते. ग्रेस केवळ शब्दकवी नव्हते. त्यांच्या कवितेचा आशयाचं शिवधनुष्य पेलायची ताकद वाचकांत निर्माण करण्याची जबाबदारी समीक्षकाची असते. सुबोधातलं सौंदर्य व दुर्बोधातील आशय एकाच ताकदीनं समीक्षक करील तर कविता आपोआप वाचकांप्रत पोहोचत राहते. कवितेची सौंदर्यस्थळे केवळ शब्दांत असत नाहीत, तर तिच्या आशयघन घाटात ही तुडुंब भरलेली असतात. ती शोधायची दृष्टीही समीक्षकच वाचकास देत असतो. समीक्षक एका अर्थाने वाचकाचा वाटाड्या, शिक्षक असतो हे विसरून चालणार नाही. समीक्षा उजवी व्हायची तर विवेचन डावं हवं, प्रगल्भ हवं.

 डॉ. चंद्रकांत पोतदार यांचा ध्यास नवी, ताजी कविता तातडीने वाचकांप्रत पोहोचविण्याचा आहे नि तो स्तुत्यच म्हणावा लागेल. इतक्या साच्या कवितासंग्रहांचे वाचन, परिशीलन करणे ही मोठी साहित्यसेवाच आहे. तिच्यातील सातत्य अनुकरणीय होय. आप्त कवींच्या कविता आपलेपणाने समजाविताना पण समीक्षकाचं सुरक्षित अंतर लेखकांनी जपायलाच हवं. अन्यथा समीक्षा हीच एक कविता बनून जाते. ती तशी । व्हायची नसेल तर समीक्षकाचा तटस्थपणा, तत्त्वज्ञानाची समाधीस्तता अधिकारायला हवी. समीक्षकाच्या हाती शब्द तोलायला लाकडाच्या वखारीतील वजनकाटा चालत नाही. सोनारी सूक्ष्मता तोलायची तर काटाही । सोनारीच हवा, याची जाणीव ही समीक्षा वाचताना होते.

 हे सारं असूनही प्रयत्नांचं साहित्यिक मोल उरतं. वर्तमानाचा समग्र आलेख यामुळे उमजतो. कवितेची धाटणी कळायला मदत होते. सौंदर्यस्थळे उमजतात. शब्दसंभाराचे भान येते. भाषिक बाज खुलतो. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कवितेची बलस्थाने अशा समीक्षा अधोरेखित करीत असतात.

प्रशस्ती/९३