पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/87

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पुरुषांच्या लबाडीचा वाडा टिकून आहे. अशा विधानांमुळेच परसाईंचं विनोदी लेखन विचारगर्भ होतं.

 मूळ कृतीबरहुकूम अनुवाद व्हायचा तर अनुवादकास अनेक व्यवधानं पाळावी लागतात. मूळ आशयास धक्का न लावता अर्थातरण व्हावं लागतं. विचार समजून घेऊन अनुवाद करावा लागतो. संदर्भाचं भान असावं लागतं. शैलीचं अढळपद सांभाळावं लागतं. कला, सौंदर्य जपणं अनिवार्य असतं. लेखकाला जे सांगायचं, सुचवायचं असतं ते पकडून त्याचे हुबेहूब प्रतिबिंब उमटवावं लागतं. ज्या भाषेत अनुवाद करणार त्या भाषेची पुरी जाण असणं पूर्वअटच असते म्हणा ना! हे सारं सांभाळत श्रीमती उज्ज्वला केळकर यांनी हा अनुवाद केला आहे. अनुवाद व कवितेची निर्मिती प्रक्रिया कधी कधी एकसारखी असते. उर्दू भाषेत ती समजून सांगणारे दोन शब्द आहेत - ‘आमद’ नि ‘आर्बुद'. जी कविता स्वयंस्फूर्त असते तिला ‘आमद' म्हणतात, तर प्रयत्नसाध्य असते तिला ‘आर्बुद' म्हणतात. खरा अनुवाद स्वयंस्फूर्त असतो. मूळ कृती अनुवादकाला। भिडली की अनुवाद झरत राहतो. म्हणून अलीकडे अनुवादास ‘पुनःसर्जन’ मानलं जातं. श्रीमती उज्ज्वला केळकर यांनी त्या वृत्ती नि तादात्म भावाने तो केला आहे. हा अनुवादिकेचा प्रारंभिक रियाज आहे. त्यात अनुवाद कौशल्याचं पक्वपण अपेक्षिणं चुकीचं. पण यात परिपूर्णता आणण्याचा अनुवादिकेचा आटापिटा, तळमळ शब्दागणिक प्रकट होते. त्यामुळे भविष्यकाळात त्यांच्या हातून यापेक्षा उत्कृष्ट अनुवाद मराठी वाचकांना भविष्यात वाचण्यास मिळतील. तशा संभावना या अनुवादात जागोजागी दिसून येतात. हरिशंकर परसाई पचवून तो प्रतिबिंबित करणं हे शिवधनुष्य । उचलण्यासारखं आहे. ते साहस करून श्रीमती केळकर यांनी आपली भाषा क्षमता, अनुवाद कुशलताच सिद्ध केली आहे.

 'नॉट पेड' मध्ये श्रीमती उज्ज्वला केळकर यांना भावलेल्या हरिशंकर परसाईंच्या निवडक कथा व निबंध आहेत. पण काही निमित्ताने समग्र परसाई वाचलेल्या माझ्यासारख्या वाचकास अशी चुटपूट लागून राहते की 'Yet good translations are to be done' ... उल्लेखच करायचा तर ‘बेचारा भला आदमी', 'ठिठुरता हुआ गणतंत्र', 'पहिला सफेद बाल', ‘विकलांग श्रद्धा का दौर', 'प्रेमचंद के फटे जुते' सारखे निबंध नि ‘सदाचार की ताबीज', 'वैष्णव की फिसलन’, ‘अकाल-उत्सव', 'गांधीजी का शाल’, ‘एक के भीतर दो आदमी' सारख्या कथा - ज्यांना परसाईंच्या श्रेष्ठ रचना मानता येईल अशांचाही मराठी अनुवाद होणे आवश्यक आहे. 'नॉट

प्रशस्ती/८६