पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/86

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यांच्या साहित्यास सामाजिक विसंगतीच्या इतिहासाचं, अभिलेखाचं रूप प्राप्त होतं. हिंदीत संत कबीरदासांनी ज्या पोटतिडकीने विसंगतीवर आघात केले, परसाई तितक्याच तडफेने ते वर्तमानात करताना दिसतात. म्हणून तर त्यांना हिंदीचे ‘आधुनिक कबीर' म्हणून ओळखलं जातं. परसाईंचं लेखन हे समकालाचं रडार' असतं. समाज काल कुठे होता, आज कुठे आहे नि उद्या कुठे जाईल याचा भविष्यवेध घेणारं हे लेखन सामाजिक अभ्यासकांना एक आव्हान असतं. त्यांचं लेखन येऊ घातलेल्या समाजाची ‘ब्लू प्रिंट मानली जाते.

 नॉट पेड' मधील या अनुवादित रचनांमधून आपणास हरिशंकर परसाईंच्या विनोद दृष्टीचं भान येतं. त्यांनी वेळोवेळी आपल्या लेखनाबद्दल केलेली विधानं या रचना वाचत असताना ध्यानी येतात -

 -व्यंग गरिबांसाठी ‘अॅलोपॅथी' नसते, न ‘होमिओपॅथी', ती फक्त ‘सिंपथी' असते.

 - व्यंग ‘स्ट्रक्चर' नसून एक ‘स्पिरीट' आहे. - पूर्वी व्यंगास लोक ‘शूद्र' मानत. आता तो ‘क्षत्रिय' झालाय. मला मात्र त्यास ‘ब्राह्मण' नाही करायचं. नाही तर तो नुसतं कीर्तन करत राहील.

 - जे हसतात, रडतात ती माणसं' असतात. तीच माझी ‘पात्रं' होऊ शकतात.

 - मी एक ‘हरवलेली वस्तू' आहे. तिचा पत्ता तुम्हीच आहात.

 - व्यंग वाचकाच्या संवेदनेस हादरवून सोडतं. ते त्यास सामाजिक विद्रूपाचा साक्षात्कार घडवून आणतं.

 - व्यंग सहेतुक असतं नि प्रतिबद्धही! - व्यंग सकारात्मक असतं नि रचनात्मकही।

 श्रीमती उज्ज्वला केळकर यांनी आपल्या अनुवादात परसाईंची ही भूमिका उतरवण्याचा प्रयत्न केला आहे. हा अनुवाद प्रमाणभाषेच्या जवळ जाणारा आहे. तो मराठी बोलीच्या जवळ जाता तर अधिक प्रभावीपणे वाचकांप्रत पोहोचला असता. या रचनातून मराठी वाचकांना अनेक जीवनभाष्य हाती लागतील. नाव होण्याची महत्त्वाकांक्षा धरण्यापेक्षा ते कमावण्यासाठी कष्ट आवश्यक असतात. साहित्य चौर्य प्रत्येक युगात असतं. फक्त युगानुरूप त्याचे चेहरे बदलतात. निःस्वार्थ उपोषण, हृदयपरिवर्तनाचं ओंगळ रूप स्वार्थावर उभं राहण्यासारखं मूल्यपतन दुसरं नाही. स्त्रीच्या भाबडेपणावरच

प्रशस्ती/८५