पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/84

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वि. जोशी, प्र. के. अत्रे, पु. ल. देशपांडे, वि. आ. बुवा, द. मा. मिरासदार, गंगाधर गाडगीळ, जयवंत दळवी, सुभाष भेंडे, रामदास फुटाणे आपणास भेटतात नि भिडतातही। हिंदीत कबीरापासून विनोद आहे पण तो व्यंगाच्या अंगाने जाणारा अधिक, मराठी विनोद कोटीच्या श्रेणीचा अधिक. विशुद्ध विनोदाची परंपरा हिंदी व मराठी दोन्ही साहित्यात क्षीण आहे.

  हरिशंकर परसाईंचं लेखन व्यंगात्मक विनोद शैलीनं अधिकांशतः झालंय. टोमणा, टिचकी, फिरकी, वस्त्रहरण, प्रहार, टीका, उपहास, आक्षेप या अंगानं जाणारं असल्यानं ते मराठी विनोदी साहित्यापेक्षा अधिक आक्रमक, आघात करणारं नि म्हणून बोचरं आहे. मराठी व हिंदी विनोदी साहित्याची स्थूल उद्दिष्टच भिन्न आहे. सर्वसाधारणपणे मराठीत विनोद रंजनासाठी लिहिला जातो. त्याला हिंदीमध्ये ‘हास्य' म्हणतात. शाब्दिक कोटीचा विनोद हिंदीत क्षीण. समाजाच्या विसंगतीवर बोट ठेवायचं, त्याची रेवडी उडवायची व ती नष्ट झाली पाहिजे म्हणून त्यावर कठोर प्रहार करायचा असा प्रघात. हिंदी काव्यातील विनोद मात्र रंजकतेकडे झुकणारा. दुष्यन्तकुमारांच्या काव्यात मात्र परसाईंसारखं गांभीर्य आढळतं.

 “नॉट पेड' मधील हरिशंकर परसाईंचे निबंध नि कथा जीवनाच्या अनेक अंगांचे नि प्रश्नांचे चित्रण करतात. माणसाची प्रसिद्धीची हाव, उच्च शिक्षणातील भ्रष्टाचार, प्रामाणिक माणसाचं भूकबळी होऊन मरण येणं, निंदा वृत्ती, साहित्याचे वैयर्थ, उपोषणाचं झालेलं अधःपतन, बुद्धिवाद्यांचं फोलपण, खासगी शिक्षणाची दुकानदारी अशा अनेक समकालीन प्रश्नांना हात घालत परसाई लिहीत राहतात. हे पाहिलं की लक्षात येतं की वर्तमान प्रश्न हेरण्याचं मोठं कौशल्य या लेखकात दडलेल्या निरीक्षकात आहे. परसाई एक समाजशील लेखक होत. व्यक्तीपेक्षा समाजकेंद्री असलेली त्यांची दृष्टी-त्यांचं मन सतत अस्वस्थ ठेवते. ही अस्वस्थता विसंगती हेरते. मग शब्दांची शस्त्रे होतात. एकाच वेळी रंजक व गंभीर लिहिण्याची सरमिसळ परसाईच करू जाणे. हिंदी समीक्षक व निबंधकार हजारीप्रसाद द्विवेदींनी व्यंग साहित्याचे वैशिष्ट्य स्पष्ट करताना म्हटलं आहे की ‘व्यंग करणारा दबल्या ओठात हसत असतो तर ऐकणारा वा ज्याच्यावर व्यंग केलं जातं त्याचा मात्र तिळपापड होत राहतो. ही असते व्यंगाची शक्ती. एकीकडे त्यात व्यर्थ नसलेलं नष्ट करण्याची त्याच्या निर्दालनाची वृत्ती असते तर दुसरीकडे नवसर्जनाची ऊर्जाही! व्यंग लेखन पुरोगामी वृत्तीचं असतं. ते बौद्धिक खाद्य असतं. हे लेखन शिळोप्याचा उद्योग असत नाही. असेलच तर तो सामाजिक बांधिलकीचा खटाटोप असतो. म्हणून हरिशंकर

प्रशस्ती/८३