पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नॉट पेड (कथासंग्रह)
हरिशंकर परसाई
भाषांतर - उज्ज्वला केळकर
मेहता पब्लिशिंग हाउस, पुणे
प्रकाशन - सप्टेंबर, २०११
पृष्ठे - १४0 किंमत - १४0/
________________________
नॉट पेड रिसीट


 'नॉट पेड' हा हिंदी साहित्यातील व्यंगसम्राट हरिशंकर परसाई यांच्या निवडक व्यंगात्मक निबंध नि कथांचा अनुवाद संग्रह होय. हा अनुवाद श्रीमती उज्ज्वला केळकर यांनी केलाय. त्यांनी आपल्या ‘अन् रजिस्टर्ड' या भूमिकेत स्पष्ट केल्याप्रमाणे मराठीत असे फारसे कुठे वाचायला मिळत नाही. म्हणून तो अनुवाद केला आहे.
  मराठी वाचक ज्याला स्थूल रूपाने विनोदी साहित्य म्हणतो त्याला हिंदीत ‘हास्य-व्यंग साहित्य' म्हणण्याचा प्रघात आहे. 'विनोद' आणि ‘व्यंग' यात मुळातच फरक आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. विनोद, उपहास, कोटी, विडंबन अशा विनोदाच्या अनेक परी आहेत. इसवी सन पूर्व कालखंडापासून विनोदी साहित्य लेखनाची व त्याच्या चिकित्सेची परंपरा विश्व साहित्यात आढळते. विनोद विचार प्लेटा, अॅरिस्टॉटलनी जसा केला तसा आपल्याकडे भरतमुनींनी पण. आधुनिक काळात थॉमस, हॉब्ज, जेम्स फीबलमन, ऑस्कर मॅडेल, इमॅन्युअर कांट, सिग्मंड फ्रॉईड, ऑर्थर कोसलर, मार्क ट्वेन प्रभृतींनी विनोदाची चिकित्सा केली आहे. मराठीत विनोदाचा प्रारंभ 'लीळा चरित्र'पासून मानला जातो. एकनाथ, तुकारामांच्या काव्यात त्याच्या छटा दिसतात. आधुनिक गद्यात श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांपासून ते मुकुंद टाकसाळेपर्यंतच्या विकास प्रवासात चिं.


प्रशस्ती/८२