पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/82

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

या साच्या प्रसंगातून गावचा प्रामाणिकपणा उभा राहतो. शिक्षकांचं भय हे त्या समाजातील नैतिकतेला मिळालेलं वरदान असतं हे ही आत्मकथा समजावते. पोटच्या पोरांसाठी... त्यांचे उपचार, शिक्षण यासाठी कर्ज घेणं, जमीन विकणं यात शहाणपण नसतं पण शिक्षणानं दशा सरेल या एकाच आशेवर कमरेचं डोक्याला बांधून कफल्लक होणारी कुटुंब हे नव्या भारताचं शल्य... त्यात उद्ध्वस्तपण भरलेलं... पण माफ अशासाठी की, एका भाबडेपणावर ते उभं आहे... पोरगं शिकेल... हे दिवस बदलतील.

 परमानाना नि वजानानी ही ग्रामीण भारतीय कृषी संस्कृतीची प्रातिनिधिक पात्रं होत. अंकुन्या या व्यवस्थेतला आशेचा किरण... तो शिक्षक होईल मग सारं सरेल हा आशावाद... त्याचे पुढे काय झालं हे ही आत्मकथा सांगत नसली तरी ती एक शक्यतेची सावली सूचित करते. गरिबांना शक्यतेवर जगण्याशिवाय पर्याय असत नाही... 'Begger have no chooice' त्याप्रमाणे 'Poor have no voice' हेही तितकंच खरं... म्हणून अंकुशला 'कमवा आणि शिका' योजनेत लेडिज हॉस्टेलमध्ये दळायला जाताना वा कॅटिनमध्ये टेबल पुसताना, ऑर्डर सर्व्ह करताना स्वाभिमान, प्रतिष्ठा खुटीला टांगून अपमानाने जगावं लागतं ते एक नाइलाज म्हणून!

 ही आत्मकथा अंकुश गाजरे यांनी लिहून ग्रामीण आत्मकथेत एक मोलाची भर घातली आहे. त्यांची ही पहिली रचना असली तरी मोठी आश्वासक आहे. ती एक दीर्घकथा वा लघु कादंबरीचा घाट घेऊन येते. या आत्मकथेचं वैशिष्ट्य असं की, ती एक व्यक्तीची कथा न होता कुटुंबाचं आत्मकथन होतं... समूहाचं आत्मकथन असलेलं याचं रूप म्हणून अभिनव! त्यांचं लेखन त्यांच्या पुढील लेखनाच्या आशा जागवतं... त्या लेखनाच्या अपेक्षेसह अभिनंदन व शुभेच्छा!

◼◼

प्रशस्ती/८१