पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/81

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

स्वप्न घालतात तसा अंकुन्या शेळ्या सोडून शाळेच्या मागं लागतो... शाळेत जातो तशी गोडी वाढते... शिकू वाटायचं पण रोज अडथळ्यांची शर्यत... पाटी हाय तर पेन्सिल न्हाय... पुस्तक हाय तर वही नाय... रोज नवा लपंडाव... शिकणं सोपं नव्हतं. त्यातच बोहाळीन मामा आला... आबीला घेऊन जाया... सायकलवरून जात होता नि आबी पडली. अपघात पन्नास हजार रुपयांना पडला तशी हातची जमीन गमवावी लागली... पण आबी हाती आली. लुळी-लंगडी झाली तरी वाचली याचाच आनंद मोठा. तिला उजवायला मोठं दिव्य करावं लागलं.
 अशा स्थितीत अंकुश गाजरे मजल दरमजल करत शिकतात. सातवी, एस.एस.सी., बारावी आणि डी.एड्. ला प्रवेश मिळवण्याची कहाणी म्हणजे ‘अनवाणी' ही आत्मकथा. ती त्यांनी आपल्या बोलीभाषेत लिहून तिच्यात एक नवा प्राण भरला आहे.

 ‘अनवाणी' ही आत्मकथा मुळातूनच वाचली पाहिजे. तिची खरी रंगत तिच्या ग्रामीण बोलीत व अंकुश गाजरेंच्या स्वानुभवजन्य सहज शैलीत आहे. या आत्मकथेचं सौंदर्य तिच्या समीक्षेत नसून तिच्या आस्वादनात आहे. देवडे, शेळव्याचा परिसर म्हणजे अष्टौप्रहर दारिद्र्याशी झुंजणारा. पुरुष शेळ्या राखून फिरणार अन् कुटुंब शेती-भाती, पोरं-टोरं सांभाळणार असं अलिखित कार्य विभाजन असलेल्या घरा-घरात अज्ञान, अंधश्रद्धा पाचवीला पुजलेली... अशा कुटुंबात एखाद्या पोरानं शिकणं म्हणजे परंपरागत घरच्या अर्थचक्राला धक्का देणं अन् चलन बंद करणं असा समज. पण अंकुश गाजरे तो समज आपल्याला लाभलेल्या शिक्षणाच्या दिव्य दृष्टीने पुसण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा तो प्रयत्न म्हणजे परिस्थितीवर मांड ठोकण्याचाच पुरुषार्थ. तो ते आपल्या जगण्याच्या भाषेतून मांडतात. ‘अनवाणी'त येणारे पाटरु, चपकारा, सौन, निवद, रुटिंग, वटा, खाकूरासारखे शब्द याची प्रचिती देतात.

 अंकुश गाजरे ‘अनवाणी'त घर, प्रसंग, परिस्थिती विलक्षण सहजपणे जिवंत करतात. माझे पाय गळाटलं होतं. पोटात अन्नाचा कण नव्हता. पोटात भुकेनं कावळ्यांची भांडणं चालू होती. पायात चप्पल नव्हती. डोक्याला उन लागत होतं. जीव भुकेनं तीळ तीळ तुटत होता.' वाचताना हे लक्षात येतं. जगण्यातून येणा-या म्हणी, वाकुप्रचार पेरत ते आपलं लेखन लोकसाहित्याच्या पठडीत नेऊन बसवतात. शेळ्या पाळताना ती त्याची लेकरं होतात हे मैनीवरून अंकुश गाजरे समजावतात.

 शाळेतून चोरी करून आणलेली पुस्तके, त्यातून घडलेलं लंका दहन

प्रशस्ती/८0