संदर्भात अशा उदाहरणांचे महत्त्व असाधारण असते. काही प्रस्तावनात खंडन मंडन असते तर काहीत उहापोह. काही तर आरोप-प्रत्यारोप, प्रश्नोत्तर अशा अंगांनीही विवेचन होत राहते. काही प्रस्तावना तर प्रश्नोत्तर शैलीतच लिहिल्या गेल्या आहेत. अण्णा भाऊ साठे यांची पहिली कादंबरी 'फकिरा' स वि. स. खांडेकरांनी लिहिलेली प्रस्तावना प्रश्नोत्तर शैलीचे आदर्श उदाहरण होय. राम गणेश गडकरी यांच्या 'एकच प्याला' नाटकाला वि. सी. गुर्जरांची असलेली प्रस्तावना अनेक कारणांनी गाजली व पुढे या नाटकांसाठी आचार्य प्र. के. अत्रे, श्री. के. क्षीरसागर यांनी लिहिलेल्या प्रस्तावना म्हणजे मूळ प्रस्तावनेच्या समीक्षा ठरल्या. प्रस्तावना सुबोध असतात, तशा दुर्बोधही. पण मूळ साहित्य कृतींचे सौंदर्य, आशय, विषय समजावणाऱ्या प्रस्तावना ग्रंथपूरक व ग्रंथप्रसारक ठरतात. काही प्रस्तावना वाचताना ही समीक्षा तर नाही ना, असे वाटून जाते. तेव्हा प्रस्तावना ही वाचक, मार्गदर्शक, प्रोत्साहक असायला हवी हे उघडच आहे. स्वकृतीस लिहिलेल्या प्रस्तावना लेखकाची विचारधारा, जीवनदृष्टी प्रगट करणाऱ्या ठरतात, हे 'विचारधारा' हा वि. स. खांडेकरांच्या कुसुमाग्रज संपादित प्रस्तावना संग्रह वाचताना लक्षात येते. प्रस्तावना हा साहित्य प्रकार सर्वसमावेशक नि विविधतेने नटलेला असतो असे कानिटकर संपादित 'गाजलेल्या प्रस्तावना' ग्रंथाच्या प्रस्तावनेत प्रा. डॉ. मनोहर आळतेकरांनी म्हटले आहे. मराठी प्रस्तावना लेखनाची परंपरा जयराम पिंडे यांच्या 'राधामाधवविलासचंपू' ग्रंथासाठी लिहिलेल्या वि. का. राजवाडे यांच्या प्रस्तावनेपासून मानली जाते. अवघ्या ४०-५० पृष्ठांच्या या काव्यास २००-२५० पानांची प्रस्तावना म्हणजे 'नमनास घडाभर तेल' नसून 'राईचा पर्वत' नसून, 'सुतावरून स्वर्गास जाता येते' असा आश्वासक, व्यासंगी वस्तुपाठ होय. 'जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. मराठीत न. चिं. केळकर, त्र्य. शं. शेजवलकर, वि. दा. सावरकर, प्र. के. अत्रे, वि. स. खांडेकर, पु. ल. देशपांडे, श्री. म. माटे, वा. म. जोशी, प्रा. नरहर कुरुंदकर प्रभृती मान्यवरांनी लिहिलेल्या प्रस्तावना वाचणे ब्रह्मानंदापेक्षा कमी नाही. 'प्रशस्ती' मात्र या पंक्ती नि मांदियाळीत खचितच बसवता येणार नाही. हा विनय नसून वस्तुस्थिती होय.
• डॉ. सुनीलकुमार लवटे