पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/79

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

लोकसहकार्याशिवाय शक्य नव्हते. लोक चोखंदळ असतात. ते देवाचे देवाला व सैतानाचे सैतानाला देण्याचा विवेक करतात, हे कोण नाकारेल?

  या चरित्रग्रंथातील समकालीनांनी लिहिलेल्या आठवणी रेव्ह. डॉ. हॉवर्ड यांच्या मोठेपणास दुजोरा देतात. यात रेव्ह. डॉ. हॉवर्ड यांनी आपली मुले आपल्याच शाळेत इतर उपेक्षित मुलांबरोबर शिकवून जो आदर्श घालून दिला होता, त्यास तोड नाही. रेव्ह. डॉ. हॉवर्ड निसर्गप्रेमी होते. प्रवासाची त्यांना आवड होती. ते अमेरिकेत जाऊन भारतीयांच्या गरजांची आवश्यकता पटवून देत व लोक त्यांना तेथून साहाय्य करीत. हॉवर्ड यांची मुले मराठी बोलत यात सर्व आले. हॉवर्ड हिंदू धर्म समजून घेत, हेही महत्त्वाचे. रेव्ह. डॉ. हॉवर्ड आपल्या मुलांना धोतर-फेटा व मुलीला साडी नेसवत असत, हे वाचून आश्चर्य वाटते. एकरूप होणे, मत, माणूस, माती यांच्याशी एक होणे हे, स्वविसर्जनाशिवाय शक्य नसते.

 अशा अनेक सौंदर्यस्थळांनी हे चरित्र भरलेले आहे. ते आपण मुळातून वाचावे. हा चरित्रग्रंथ म्हणजे एतद्देशीय उपेक्षितांच्या स्वीकाराची, विकासाची कहाणी आहे. ती परकेपणाचा चश्मा दूर केल्याशिवाय तुमच्या हृदयाला । भिडणार नाही. आज एकविसाव्या शतकातही भारतात जातीय भेद, धर्म, घृणा, जातीय अभिनिवेश, प्रांतवाद, भाषावाद उफाळतो. कारण, आपण खच्या माणूसविकासाचा मार्ग समजून न घेतल्याची ती खूणगाठ आहे. जोवर आपण जातिअंताचा प्रवास सुरू करून धर्मनिरपेक्ष माणूसकेंद्री भारताचे स्वप्न पाहणार नाही तोवर कितीही हॉवर्ड इथे खपले, तरी ते पालथ्या घड्यावर पाणीच ठरेल.

 गुलाबराव आवडे यांचे या देशकार्याबद्दल अभिनंदन!

◼◼

दि. २५ डिसेंबर, २०१० नाताळ

प्रशस्ती/७८