पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/78

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

समाजाने लिहिलेले वाटते. त्यास गौरवग्रंथाचे रूप येणे हे त्याचेच प्रतीक होय.

 या चरित्राचे आणखी एक वैशिष्ट्य असे की, यातून रेव्ह. डॉ. हॉवर्ड याचे समग्र जीवन व कार्य समजते. एका परक्या ठिकाणी आपले पूर्वायुष्य, संस्कार, संस्कृती सोडून यायचे, जिथे जायचे तिथे त्या परिसराचा भाग होऊन जायचे, तिथले सुखदुःख आपले मानायचे, लोकांना लळा लावायचा, त्यांच्यातलाच एक होऊन राहायचे ही गोष्ट सोपी नाही. ते येरागबाळ्याचे काम नाही. ते केवळ ध्येयवेडेपणामुळे व तीव्र अंतःप्रेरणेने शक्य आहे. मिशनरी कार्य पाहता मला तर असे वाटते की, त्यांनी केलेले कार्य धर्मप्रेरणेने झाले असेल; पण ज्या माणूस धर्माचे ते जिवंत कार्य करायचे, त्यात त्यांना येशूची शिकवण प्रतिबिंबित झालेली अनुभवायला यायची. बायबलने जगात जे मोठे काम केले, ते हेच होय. जात, धर्म, भाषा, प्रांत, लिंगभेद विसरून कितीही किळसवाणे व कठीण कार्य असो, ते करायचे, कारण खरा ईश्वर गरजेत शोधायचे तत्त्वज्ञान हे बायबलचे मोठे बलस्थान आहे. हिंदू धर्माने त्याची उपेक्षाच केली असे म्हटले तर वावगे ठरू नये. हजारो हिंद ख्रिश्चन होतात. हिंदचे मुस्लीम होणे आणि ख्रिश्चन होणे यात मूलभूत अंतर आहे. हिंदू मुसलमान झाले ते तलवारीच्या जोरावर. उलटपक्षी, ते ख्रिश्चन झाले ते हृदयपरिवर्तनामुळे. काही लोक आमिष वा लालूच दाखवून धर्मपरिवर्तन झाले, असे सांगतात. पण, सर्वांत मोठे ख्रिश्चनांचे यश भेदातीत मनुष्यस्वीकृतीत आहे, हे इतिहास व काळास नाकारता येणार नाही.

  रेव्ह. डॉ. हॉवर्ड हे हाडाचे शिक्षक व समाजसेवक होते. ते बहुभाषी होते. संस्कृत, इंग्रजी, ग्रीक, लॅटिन, हिब्रू भाषा त्यांना अवगत होत्या. ते बहुश्रुत होते. भाषांतरकार म्हणून त्यांनी केलेले कार्य कोण विसरेल? गरीब ग्रामीण भारतीयांना शिक्षण देण्यानेच ते उर्जितावस्थेस पोहोचतील, अशी खात्री असल्याने त्यांनी शिक्षण हे मनुष्योद्धाराचे साधन मानून कोडोली कम्युनिटी स्कूलचा विस्तार केला. तिथे पिढ्या घडवल्या. रेव्ह. हॉवर्डचे कार्य एतद्देशीय जनतेस निरपेक्ष वाटले म्हणून तर त्यांनी त्या हायस्कूलचे नामांतर करून हॉवर्ड मेमोरियल हायस्कूल केले. त्यांनी केवळ धर्मातराचे काम केले असते व ते सक्तीने केले असते, तर हे घडणे अशक्य होते, हे आपण समजून घेतले पाहिजे. सुवार्तेच्या कार्यापेक्षा सुजनांची सेवा त्यांनी अधिक केली, हे या चरित्रातून स्पष्ट होते. त्यासाठी त्यांनी चौफेर प्रयत्न केले. निधिसंकलन केले. इमारती उभ्या केल्या. हे सर्व लोकसहभाग व

प्रशस्ती/७७