पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

रेव्ह. हेन्री हॉवर्ड : जीवन व कार्य (चरित्र)

गुलाबराव आवडे
डॉ. अजित आवडे, कोल्हापूर
प्रकाशन - डिसेंबर, २0१0
पृष्ठे - १६६ किंमत - १६६/
__________________________
कृतज्ञतेतून साकारलेले साग्र चरित्र


 भाषा व साहित्यव्यवहारात शब्द दोन प्रकारे रूढ होताना दिसतात. एका प्रकारात शब्दांतच आशय पुरेपूर भरलेला असतो, तो शब्दसामथ्र्यामुळे व्यवहारावर प्रभाव टाकतो. उदा. जिव्हाळा शब्द. तो प्रेम, आस्था, आपुलकी, आत्मीयतेने काठोकाठ भरलेला असल्याने त्या शब्दाचा वापर करताच, त्यातील गुणांचा झरा आपसूकच वाहू लागतो. दुस-या प्रकारात व्यवहारसामर्थ्य, सातत्यामुळे शब्दांना एका वेगळ्या अर्थसामर्थ्याची झळाळी येते. अशा पठडीतला शब्द आहे, मिशनरी झील (Missionary Zeal). शब्द आहे इंग्रजी; पण मराठीत तो बहुप्रचलित वा प्रचारित आहे. मिशनरी शब्द उच्चारला की, त्यास जोडून एक शब्द लागतो- ख्रिश्चन. ख्रिश्चन मिशनरी. त्यांनी जगभर धर्मप्रसाराचे जे कार्य सेवाभावाने नि समर्पणाने केले, त्यामुळे ख्रिश्चन मिशनरी या शब्दाचा एक अर्थच रूढ होऊन बसला आहे आणि तो म्हणजे समर्पित व्यक्ती.
 मिशन अनेक प्रकारची असतात - धार्मिक, राजकीय, सामाजिक, कार्यविषयक वा अगदी युद्ध, हेरगिरी व अलीकडे दहशतवाद्यांचीही ती असतात. पण, लोकव्यवहारात या शब्दाला जो सकारात्मक व सर्जनात्मक अर्थ प्राप्त झाला आहे, तो ख्रिश्चन मिशन-यांच्या कार्यामुळे. ख्रिश्चन मिशनरींनी प्रामुख्याने दोन कार्ये केली (१) धर्मप्रचार, प्रसार व धर्मांतर

प्रशस्ती/७४