पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/74

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

देत नाही. हा दोष व्यक्तीचा नाही. सामाजिक परंपरा, चाली, रूढी, जातीय उतरंड, धर्मभेद यांचंच ते अटळ अपत्य होय. श्री. आवडे ठिगळ' या आपल्या आत्मकथेत आपली जीवनगाथा क्रमबद्धपणे सादर करतात. पण पूर्ण करतात असं म्हणणे म्हणजे सत्याचा अपलाप ठरेल. प्रत्येक आत्मकथा लेखनामागे लेखकाचा उद्देश असतो. इथे जात व धर्माच्या कात्रीत सापडलेल्या माणसाची परवड शब्दबद्ध करण्याचा हेतू आहे. आपली सारी कथा त्यांनी क्रमबद्धपणे मांडली आहे. ती कलात्मक करता येणे शक्य होते. पण असे असले तरी प्रांजळ आत्मकथन म्हणून तिचे सौंदर्य राहतेच. ही आत्मकथा ‘जे जसे घडले तसे' अशा सरधोपट पद्धतीने आपल्यासमोर येते. त्यामुळे ती उद्देशाच्या निष्कर्षापर्यंत पोहोचत नाही. ती पोहोचती तर अधिक प्रभावी होती.

 श्री. आवडे यांना लेखनाची तळमळ असली तरी आपल्या मर्यादांचं त्यांना भान आहे. मनोगतातील पहिलंच वाक्य अशी टाळी घेतं. वर्णाश्रम व्यवस्था समूळ नष्ट झाल्याशिवाय माणूस म्हणून असलेली अपेक्षित समानता साकारणार नाही याचं भान ‘ठिगळ' देतं. वर्तमान हिंदू समाज अठरापगड जातीच्या ठिगळाची गोधडी आहे. ती समता व स्वातंत्र्याच्या उभ्या-आडव्या धाग्यांनी तलम वस्त्र बनवायची तर लोकशाही, धर्मनिरपेक्षता, विज्ञाननिष्ठा, सामाजिक समायोजनेचे भान समाजात रुजायला हवे, हे ‘ठिगळ' वाचताना प्रकर्षाने जाणवते. ही जाणीव हेच या आत्मकथेचं फलित व यश होय. धर्मांतर झाले तरी समाजात मन्वन्तर घडले नाही याची । श्री. आवाडे यांची बोच त्यांच्या समाजशील व्यक्तिमत्त्वाची खूण होय.

 ‘ठिगळ'मुळे दलित, धर्मांतरितांच्या वेदनांना स्वर मिळाला आहे. आजवर दलित साहित्याने विशेषतः त्यातील आत्मकथनांनी जातीय परीघात राहनच लेखन केले आहे. धर्मांतरित नवबौद्धांच्या वेदना यात अधोरेखित झाल्या. त्यापण सूचकतेने व तुटकपणे. नवख्रिश्चन दलितांचं जीवन, जगण्याची घालमेल ‘ठिगळ'मुळे पहिल्यांदाच समाजासमोर येत आहे. एकविसावे शतक दया नि क्षमाशीलतेचे, सहिष्णुतेचे व्हायचे असेल तर जीवनाचे असे नवे कंगोरे पुढे आले पाहिजेत, हे ‘ठिगळ'चे ऐतिहासिक योगदान होय. ‘ठिगळ'चे प्रकाशन नव्या सामाजिक वस्त्रविणीची सुरुवात होय. शुभास्ते पंथानः सन्तु!

◼◼

दि. १७/३/२००९

प्रशस्ती/७३