Jump to content

पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

'गागर में सागर' भरण्याचा भगीरथ प्रयत्न असतो. 'प्रशस्ती ' मध्ये नवोदितांसाठीचं लेखन अधिक असणे हे माझ्या लेखकाचे सामान्यत्व सूचित करते. त्याचे विविधांगी असणे माझ्या लोकसंग्रहाचे निदर्शक होय. यातील अनेक रचना समाजलक्ष्यी असणे माझ्या समाजशील संपर्काची फलश्रुती म्हणायला हवी तर यातल्या साहित्य कृती माझ्या साहित्य व्यासंगाची परिणती म्हणावी लागेल. या लेखनाने माझी साहित्य कक्षा आणि क्षितिज विस्तारले, रुंदावले हे जरी खरे असले तरी त्याच्या खोलीच्या मर्यादा नि वैगुण्याची मला जाणीव आहे, त्याचे भानही आहे.
 'आमचा काय गुन्हा?', 'भंगार', 'कोंडलेले हुंदके', 'ठिगळ', 'अनवाणी', 'दुःखभोग', 'वास्तव', 'नाथा', 'आनंदाश्रम' अशा साहित्य रचनांना मी लिहिलेल्या प्रस्तावना म्हणजे माझ्या वंचित समाजाप्रती असलेल्या आस्था नि अस्मितेची प्रतिबिंबे होत. त्या प्रस्तावनांपेक्षा मूळ साहित्यकृती श्रेष्ठ होत. 'वास्तुपर्व' ची मी केलेली भलावण केवळ शाब्दिक नसून ती दृष्टिकोण विकासाची माझी धडपड होय. शिक्षण, समाज, साहित्य, चित्र, शिल्प, निसर्ग असा 'प्रशस्ती'तला फेर तुमचे जीवन जगणे प्रगल्भ करेल असा मला विश्वास वाटतो. 'नॉटपेड रिसीट' वाचली की विनोद किती जीवनलक्ष्यी असायला हवा याची तुम्हास खात्री पटेल. यातील संशोधन प्रबंधासाठी लिहिलेल्या प्रस्तावना लेखनाने माझे खांडेकरी साहित्याचे आकलन अधिक स्पष्ट झाले. त्यामुळे माझ्या लक्षात आलेली गोष्ट अशी की प्रस्तावनाकार प्रस्तावना लिहून अन्य लेखकांना उपकृत न करता, ती त्या लेखकांनी प्रस्तावनाकारास आकलन विस्ताराची दिलेली संधीच असते. 'जलद आणि प्रभावी वाचन' सारख्या पुस्तकांनी मला वाचन हे वैज्ञानिक असते याची जाणीव करून दिली. त्यातून मला केवळ 'वाचन' विषयावर लिहिण्यास प्रवृत्त केले. ते लवकरच मेहता 'मेहता' त्यामुळे प्रस्तावना लेखन हा उभयपक्षी समृद्धीचा सोपान म्हणायला हवा. झाडू कामगार असलेले विजय शिंदे मुळात कवी असतात. सफाई हा त्यांचा पोटापाण्याचा उद्योग असला, तरी कविता करणे त्यांचे जीवन जगणे असते हे प्रस्तावना लेखनाने मला दिलेले शहाणपण होय.  अन्य अनेक साहित्य प्रकारांच्या प्रमाणे प्रस्तावनेची स्वतःची अशी एक स्वरूप रचना असते. प्रस्तावनेचा उद्देश लक्ष्यित ग्रंथ वा साहित्य कृतीचा परिचय करून देणे असतो. प्रस्तावनाकार आपल्या लक्ष्य ग्रंथातील नरम बिंदू (Weak Points) सूचकतेने सांगतो तर बलस्थाने अधोरेखित करतो. त्यासाठी तो प्रसंगी उदाहरणेही उद्धृत करतो. विशेषतः काव्यकृतींच्या