पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/68

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 निदान म्हणजे ५0% यश. उपचार हा खरंच उपचारच असतो. तो नर्स, कंपाऊंडरही करू शकतो. डॉक्टर देव वाटतो, ते त्यांच्या रुग्णांशी असलेल्या लळ्यामुळे, त्यांच्यातील गुंतवणुकीमुळे, रोगाची बाह्य लक्षणे एक असली तरी वास्तव भिन्न असू शकतं. ते रडके मूल' वाचलं की लक्षात येतं. या व्यवसायात ‘पिण्डे पिण्डे मतिर्भिन्नाः' हे तत्त्व सर्वार्थाने लागू होते. ‘सब घोडे बारा टक्के’, ‘अंदाज पंचे दाहोदरसे' असं असत नाही. प्रत्येक वेळी यश येत नाही. निष्काम कर्मयोग्याप्रमाणे तुम्हास कर्तव्यपरायण राहावं लागतं. रुग्ण लहरी असतात, ढोंगी असतात याचं भान ज्या डॉक्टरला असते तो 'मामा' होऊ देत नाही. प्रसंगावधान पाहून वागणारा डॉक्टर अग्निपरीक्षेतून सहीसलामत सुटू शकतो. वड्याचे तेल वांग्यावर काढणारे रुग्णांचे नातेवाईक असतात, हे या पुस्तकातून उमगतं.
 ‘पेशंटचे किस्से' हे पुस्तक वाचून संपलं की लक्षात येतं की, हे रुग्णालयाशी संबंधित वा मर्यादित राहात नाही. सारा समाज एक मनोरुग्णालय आहे, याचं भान देणारं हे पुस्तक म्हणून केवळ एका डॉक्टरांच्या आठवणी, अनुभव, किस्से असं मर्यादित न राहता माणूस वाचणारी ती गाथा ठरते. एकविसावं शतक हे व्यक्ती अवलोकन व विकासाचे शतक आहे. या शतकात अनुभवजन्य लेखन हे समाजोपयोगी एक वरदान म्हणून पुढे येत आहे. या शतकात कल्पनेस महत्त्व आहे. ते साहित्यात नव्हे तर विज्ञानात. गेल्या शतकाचं साहित्य कल्पनाप्रचुर होतं. त्याची जागा अपरिचित, अलिखित अनुभवविश्वाने घेतली आहे. डॉक्टर शरद प्रभुदेसाई यांचं पुस्तक अशाच सर्वथा नव्या जगात आपणास घेऊन जातं. माणसांची नवी ओळख, नवे चेहरे, नवी पारख, नवी दृष्टी देणारं हे पुस्तक केवळ डॉक्टर नि रुग्णांमधील जीवनव्यवहार राहात नाही तर माणूस समजून घ्यायचा वस्तुपाठ म्हणून या पुस्तकांचे सामाजिक महत्त्व असाधारण आहे. त्यातून मिळणारं समाजशिक्षण लाख मोलाचं आहे. ते विद्यापीठाच्या उच्च शिक्षणातून मिळणार नाही. लोकव्यवहार व लोकशिक्षणासारखं खरं समाजशिक्षण नाही हेच खरे, असं भान देणारं हे पुस्तक प्रत्येकाने वाचावं. त्यातून शिकावं व आपला परस्परांशी व्यवहार बदलावा, ही या पुस्तकाची खरी शिकवण होय. ती दिल्याबद्दल डॉक्टर शरद प्रभुदेसाईंचे अभिनंदन!

▄ ▄


दि. २६ जुलै, २00८

प्रशस्ती/६७