पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/67

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पूर्वअटच असते. डॉक्टरला त्याचं म्हणून काही जीवन, हक्काचा वेळ असतो वा असावा हे रुग्णाच्या गावीही नसतं किंबहुना तो अष्टौप्रहर आपणास उपलब्ध असणे हा रुग्ण म्हणून आपला अधिकार आहे, असाच समाजप्रघात दिसून येतो. डॉक्टर पैसे घेतो हे खरे; पण तो मुळात एक समाजसेवी असल्याशिवाय या व्यवसायात यशस्वी होऊ शकत नाही, हे प्रखर वास्तव होय.

 डॉ. प्रभुदेसाई यांना रात्रंदिनी रुग्णांचा ध्यास असतो. म्हणून रुग्णांबरोबर ते औपचारिक राहू शकत नाहीत. रुग्णांसाठी काम करत असताना त्यांची भूमिका निष्काम कर्मयोग्याची असते. एका अर्थाने फकिरी वृत्तीने ते ‘रुग्णोदेवो भव' म्हणून आपले कर्तव्य बजावत असतात. कुणाला त्याची जाणीव होते, कुणास होत नाही. पण ते आपल्या सेवा नि कर्तव्यभावनेवर अविचल, दृढ असतात. त्यामुळे त्यांना सुखी निद्रा नि मुद्रा लाभली आहे. त्या सर्व कर्तव्ययज्ञातील काही समिधा त्यांनी शब्दरूप केल्या नि वाचकांसमोर सादर केल्या आहेत. |

 ‘पेशंटचे किस्से' या आठवणींच्या ओंजळीत त्यांनी व्यवसायात आलेले ४0 अनुभव नोंदलेले आहेत. हे पुस्तक त्यांनी आत्मस्तुतीसाठी लिहिलेले नाही. त्यामागे समाजशिक्षणाचा उद्देश स्पष्ट आहे. डॉक्टरची रुग्णामध्ये किती मानसिक गुंतवणूक असते, हे सदर पुस्तकवाचनाने उमगते. यातून रुग्णांच्या कळा, वेदनांचा पाझर उमटतो. तद्वतच रुग्णांचे आई-वडील, नातलग यांच्या नाना कळा, त-हाही समजून येतात. डॉक्टर चांगला असून चालत नाही. ब-याचदा तो रुग्णांच्या हिताचे, हिताच्या उद्देशाने काही खरे बोल सुनावतो. डॉक्टरवाक्यं प्रमाणम्' असे प्रमाण मानून वागणा-या । रुग्णास लवकर उतारा येतो. डॉक्टरला रुग्णांचा लळा असतो म्हणून ते समुपदेशनातून, संवाद, प्रश्नोत्तरातून रुग्णांची पूर्वपीठिका, लक्षणे समजून घेतात. मग रोगाची पूर्वपीठिका, पूर्वकृती, पूर्वोपचार, पूर्वलक्षणे समजून घेऊन निदान निश्चिती महत्त्वाची. डॉक्टर प्रभुदेसाई समाजयोजनापेक्षा समुपदेशन महत्त्वाचे मानणारे डॉक्टर होत. | रुग्ण अंधश्रद्ध असतात. त्यांना त्या गर्तेतून बाहेर काढताना मोठ्या दिव्यातून जावे लागते. बालरुग्ण रडतो. त्याच्या रडण्याचे निदान करायला तर्क-वितर्क, पूर्वानुभव सारे एकवटावे लागते. ते येरागबाळ्याचे काम नाही. ते केवळ डॉक्टरी पदवीने येत नाही. डॉक्टरमध्ये ‘माणुसकीची डिग्री', 'संवेदनासूचकांक किती चरमसीमेचा, टिपेचा - त्यावर निदान निश्चिती होते.

प्रशस्ती/६६