पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/61

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मनात घोंघावत राहते. प्रश्नांची ही गांधील माशी पुस्तकात केवळ घोंघावते, तरी मनुष्य अस्वस्थ होतो. तिने आपल्या विखाराचा दंश केला तर समाजमनाची काय काहिली होईल याची कल्पनाच केलेली बरी!

 ‘अधांतरी' ही नवजात अनाथ अर्भकांच्या व्यथा-वेदनांची गाथा आहे. ती कुमारी मातांची तगमग तळमळीने व्यक्त करणारी करूण कहाणी आहे. सामाजिक धर्मबुद्धीअभावी व सामाजिक न्यायाचा हक्क स्वातंत्र्याच्या गेल्या बासष्ठ वर्षात ज्या प्रमाणात पदरी पडायला हवा होता तो पडल्यानं जे अरिष्ट ओढवलं त्याची ही कर्मकहाणी आहे. प्रासंगिक दयाबुद्धीनं, खोट्या सहानुभूतीच्या प्रदर्शनानं, स्वतःचे अधिकार न सवलती सुरक्षित ठेवून नवी रचना कधीच अस्तित्वात येत नाही. नवं मिळवायचं तर जुनं सोडावं लागतं. ‘जुनं ते सोनं' हा विचार केव्हाच इतिहास जमा झाला आहे. समाजातील दलित, वंचित, अपंग, स्त्री-पुरुष सामाजिक न्यायाच्या एकाच तराजूने जोखण्याची गरज आहे. त्यासाठी नव्या समाजजागराची वेळ येऊन ठेपली आहे. ती हे अधांतरी आपल्याला जाणवून देते. ज्यांना समाजाची धारणा व पुनर्रचना ‘मनुष्य' निकषावर व्हावी वाटते त्या सर्वांना हे पुस्तक नवी दृष्टी व बळ देते. ते दिल्याबद्दल प्रा. प्रभावती मुठाळ यांचे आभार नि अभिनंदन!

◼◼


दि. २ एप्रिल, २००९

प्रशस्ती/६०