पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/60

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

करण्याचा, अनाथ मुलं, मुली नि कुमारी मातांचं विश्व, त्यांचे कायदे, त्यांचं कल्याण करणारी वर्तमान व्यवस्था हा ‘अधांतरी'चा परीघ आहे. अनाथ मुलं नि कुमारी मातांची समाज व शासन स्तरावरील सद्यःस्थिती ‘धोबी का कुत्ता, ना घर का ना घाट का' अशी झाली आहे हे ‘अधांतरी'नं अत्यंत प्रभावीपणे दाखवून दिलं आहे. त्यामागे या प्रश्नाविषयीची लेखिकेची जाण व तळमळ वाखाणण्याजोगी आहे. विकतचं श्राद्ध करणारी, निखार पदरात घेऊन फिरणारी फार कमी माणसं समाजात असतात. त्यात प्रा. प्रभावती मुठाळ यांचा समावेश करावा लागेल.

 एकविसाव्या शतकातील मनुष्यसमाज हा आत्मकेंद्रित जसा आहे तसा स्वार्थी नि संकुचितही! खरं तर तो आत्मकेंद्रित असल्यानेच संकुचित आहे. तुम्ही जसे निःस्वार्थी व्हाल तसे व्यापक होता. दूरचं दिसायचं तर जवळचं, हातातलं, केवळ आपलं पाहणं सोडायला हवं. दुःख केवळ आपलंच नाही, जगाचं पण असू शकतं नि आपल्यापेक्षा अधिक नि भयंकर असतं हे आपल्या पलीकडे जाऊन पहायला शिकल्याशिवाय दिसत नाही. स्वातंत्र्याच्या गेल्या बासष्ट वर्षांच्या प्रवासात आपला राजकीय प्रवास हा मतांवर डोळे ठेवून झाला. सामाजिक प्रश्नांकडे आपण जात, धर्माची उतरंड सुरक्षित राहील अशा बेतानेच पाहिलं. धर्मनिरपेक्षतेपेक्षा आपला जीवनव्यवहार धर्मांधच राहिला. परिणामी, खरा सामाजिक न्याय येऊच शकला नाही. त्याचे मुख्य कारण आपली सामाजिक न्यायाची कल्पनाच मुळी जात, धर्मावर उभी होती. खरी सामाजिक धर्मबुद्धी ही जात, धर्म, वंश, प्रांत, भाषा, संस्कृती, लिंग यापलीकडे जाऊन मनुष्यकेंद्रित हवी. दलितांचे प्रश्न आहेत. पण दलित लोक वंचितांचे प्रश्न आपले' मानतात का? मानत असतील तर त्यांच्या सोडवणुकीत त्यांचे योगदान काय? स्त्रियांचे प्रश्न आहेत. पण त्यात कुमारी माता, परित्यक्ता, विधवा, घटस्फोटित, वृद्ध, अशिक्षित स्त्रियांचे प्रश्न खरे ऐरणीवरचे प्रश्न नव्हेत का? सामाजिक प्रश्नांवर ‘आरक्षण' हा काही रामबाण उपाय नव्हे. शिवाय तो कालातीत नाही. तो समाजाच्या वंचित वर्गास मध्यप्रवाहात आणणारा सामाजिक न्यायाचा खुश्कीचा नि तात्पुरता मार्ग आहे. तो जात, धर्म, वंश, लिंगभेद न मानता ‘मनुष्य' या एकाच कसोटीवर लावणे शक्य नाही का? ते अधिक सर्वसमावेशक नव्हे का? सामाजिक समावेशन धोरणाचे वेळोवेळी मूल्यांकन होऊन वर्तमानात अधिक गरजू वर्ग कोण हे ठरवून त्यानुसार आपले कायदे, घटना, विकास योजना नको का तयार व्हायला? असे सारे सामाजिक प्रश्नांचे मोहळ ‘अधांतरी' वाचताना वाचकांच्या

प्रशस्ती/५९