पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/6

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रस्तावनेचे स्वरूप, रचना विशद करण्यात आली आहे. यशवंतराव चव्हाण यांनी पण अनेक ग्रंथांना प्रस्तावना लिहिल्या असून त्यावर आधारित 'यशवंतरावांच्या प्रस्तावना', 'प्रस्तावनाकार यशवंतराव चव्हाण' सारखी पुस्तके प्रसिद्ध आहेत. प्रस्तावना म्हणजे एखाद्या लेखनाचा दुसऱ्याने केलेला पुरस्कारच असतो. लेखक जेव्हा स्वतःच्या साहित्यकृतीस प्रस्तावना लिहितो तेव्हा तर तो आपल्या लेखनाचा उगम, प्रेरणा, शैली, आशय, विषय, दृष्टिकोन, विचार इत्यादीबद्दलचे आपले अंतरंगच उघडे करीत असतो. चेहऱ्यामागचा चेहरा म्हणून इंग्रजीत त्याला 'पूर्वरूप' या अर्थाने 'Preface' शब्द आहे. अठराव्या शतकातील इंग्रजीतील प्रसिद्ध कवी, पत्रकार, कोशकार, समीक्षक मॅन्युअल जॉन्सन (१७०९-१७८४) यांनी आपल्या 'डिक्शनरी' (१७५५) या कोशास लिहिलेली प्रस्तावना जगप्रसिद्ध आहे. या प्रस्तावनेने भाषेतील शब्दांची व्युत्पत्ती, विविध अर्थछटा, शुद्धता इत्यादींसंदर्भात वैश्विक परिमाणे निश्चित केली आहेत असे मानले जाते. तीच गोष्ट शेक्सपिअरची. त्याने आपल्या नाटकांना लिहिलेल्या प्रस्तावना नाटकांइतक्याच वाचनीय, विचारणीय मानल्या गेल्या आहेत. त्यांच्या काही नाटकांच्या प्रस्तावना तर नाटक संहितेपेक्षा मोठ्या आहेत. हार्ले ग्रॅनविलेलिखित 'प्रिफेस टू शेक्सपिअर' हा चतुष्खंडी ग्रंथराज (१९२७- ४८) म्हणजे प्रस्तावना साहित्यातील दीपस्तंभच! इंग्रजी भाषेत प्रस्तावनेस तिच्या स्वरूपावरून वेगवेगळे शब्द वापरण्याचा प्रघात आहे. म्हणजे असे की 'Introduction' म्हणजे एखाद्या पुस्तकाची ओळख करून देणे होय ( पुस्तक परिचय ). 'Forward' म्हणजे दुसऱ्याच्या साहित्य वा पुस्तकाच्या पुरस्कार, प्रशस्ती, प्रशंसेसाठी केलेले लेखन; तर 'Preface' म्हणजे स्वतःच्या साहित्यकृती वा पुस्तक समर्थनार्थ केलेला लेखनप्रपंच वा खटाटोप होय. माझे हे प्रस्तावना लेखन स्वप्रशस्ती होय. आत्मश्लाघा, आत्मस्तुती, आत्मकथन असं जे काही आत्मपर लेखन असते, ते लेखनातील 'नार्सीझम'चे रूप होय. हे माहीत असतानाही मी हे लिहिण्यास धजावतो आहे, त्याची कारणमीमांसा करणे मला आवश्यक वाटते.
 नवोदित लेखकास प्रारंभीच्या काळात कुणी तरी प्रोत्साहन, उत्तेजन देण्याची गरज असते. ते कार्य रुळलेला लेखक करीत असतो. दुसऱ्यांच्या साहित्यकृतीस प्रस्तावना लिहीत प्रस्तावनाकार बहुश्रुत, बहुआयामी बनत स्वतः समृद्ध होतो. प्रस्तावना लिहिणे म्हणजे लक्ष्य कृतींचं समग्र आकलन करणे. त्याशिवाय कुणासच प्रस्तावना लिहिता नाही येणार. शिवाय ती संक्षेपाने लिहिणे अपेक्षित असल्याने तिची साक्षेपी व संक्षेपी शैली म्हणजे