पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/59

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 प्रा. प्रभावती मुठाळ जन्माने सवर्ण, विवाहाने त्या शूद्र होतात. विवाहित जीवनानंतर दलित समाजातील स्त्रियांची दुःस्थिती त्यांना विकल करते. त्या सेवेतून निवृत्त होतात. त्यांच्या जीवनात पोकळी निर्माण होते. मुले शिकून-सवरून मोठी झालेली. पापड, कुरडया, लोणची घालून उर्वरित आयुष्य रिकामं कंठणं त्यांच्या जीवावर येतं. दरम्यान डॉक्टर मुलगा आपल्या दवाखान्यात एक चिमुरडी मुलगी जगण्याचा चिवट संघर्ष करत कशी श्वास टिकवून आहे याची रामकहाणी सांगतो. प्रभावतीताईंच्यात त्यातून दुसरे मातृत्व जन्मते... त्या मोहिनीला आपलंसं करतात... त्यासाठी त्या कायद्याची व त-हेवाईक माणसांशी मोठी लढाई खेळतात... ‘लढल्याशिवाय हरायचं नाही' चा संस्कार त्यांना यश देतो... त्या अनाथाश्रम चालवतात... अनेक अनाथांना अभय देतात... त्यातून त्यांना अनाथांचं विश्व, कायदे, शासकीय यंत्रणा, समाज, माणसं यांची खरी ओळख होते. समाजशिक्षण पदरी येतं. जे जे आपणासी ठावे। ते ते दुसन्यासी सांगावे।। शहाणे करूनि सोडावे। सकल जन।।' या न्यायाने आपला अनुभव कथन करतात. आणि त्यातून अनाथांचं एक ‘अधांतरी' जीवन आपल्यापुढे येतं. ते आपल्यात जात, धर्म या पलीकडे जाऊन सामाजिक न्यायाची कसोटी विचारतं... आपल्यात एक सामाजिक धर्मबुद्धी जागवतं... माझ्या दृष्टीनं ‘अधांतरी' या अनुभवकथनाची ही सर्वांत मोठी जमेची बाजू होय.

 ‘अधांतरी'मध्ये प्रा. प्रभावती मुठाळ यांनी आपले अनुभव व त्यातून जागृत झालेल्या जाणिवा, आलेलं भान तीन भागांत मांडलं आहे. प्रथम भागात त्या मोहिनीचं पालकत्व पेलणं, झेलणं नि त्यासाठी करावे लागलेले कायदेशीर व मनुष्याच्या अधिकारकर्तव्याचे द्वंद्व चित्रित करतात. दुसच्या भागात मोहिनीसाठी अनाथाश्रम सुरू केल्यानंतर ज्या कुमारी माता, अनाथ मुलं यांना संरक्षण देऊन त्यांचे संगोपन, शिक्षण, संस्कार करतात त्याचे विविध अनुभव व आठवणी विशद करतात. अधांतरी'चा तिसरा भाग। वैचारिक व वैधानिक आहे. यात त्या कुमारी माता व अनाथ मुले यांचा सांभाळ करणारं महिला व बालकल्याण मंत्रालय, आयुक्तालय, तेथील अधिकारी, यंत्रणा, मनुष्य-व्यवहार, कायदे, कायद्यातील त्रुटी यांच्यावर बोट ठेवत, त्यात सुधारणा झाल्या असल्या, तरी सुधारणेस अद्यापही भरपूर वाव असल्याचं अधोरेखित करतात.

 कोणतीही यंत्रणा व व्यवस्था कधीच निर्दोष असत नाही. सुधारणा, दुरुस्ती ही एक निरंतर समाजक्रिया आहे. त्यातूनच कल्याणाचा मार्ग विकासाकडे कूच करत असतो. प्रश्न आहे तो मनुष्य म्हणून जीवनव्यवहार

प्रशस्ती/५८