पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/53

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पर्यावरणप्रेमी सुंदरलाल बहुगुणा, नर्मदा बचाव'च्या मेधा पाटकर, अवकाशयात्री कल्पना चावला यांची चरित्रे व ‘फिटे अंधाराचे जाळे', ‘चाकाची खुर्ची’, ‘खाली जमीन वर आकाश', ‘पोरके दिवस’, ‘बिनपटाची चौकट' सारखी आत्मचरित्रे व्यक्तिमत्त्वाचा खरा विकास घडवू शकतील. अशा क्रमिक पुस्तकांच्या अध्यापनासाठी मूल्य संस्कार, मूल्य संवर्धनार्थ पूरक वाचन म्हणून वरील काही ग्रंथ सुचवणे आवश्यक वाटते. सैद्धांतिक शिक्षणापेक्षा अनुभवजन्य शिक्षण, वाचन हे परिणामकारक असते. दहशतवाद आज जागतिक समस्या बनली आहे. पर्यावरणाच्या विध्वंसामुळे नैसर्गिक संकटे वाढताहेत. अशा काळात नवी आव्हाने पेलण्याचे शिक्षण दिल्याशिवाय या शतकातील पिढी ख-या अर्थाने जबाबदार व सक्षम होऊ शकणार नाही. याचे भान ठेवून पुस्तकात नव्या विचार व व्यवहाराची दिली गेलेली जोड स्तुत्यच होय.

 समग्रतः ‘व्यक्तिमत्त्व विकासाची सूत्रे हे पुस्तक नव्या माणूस घडणीची सूक्ते गाणारे व नवमूल्य रुजवणारे एक सक्षम संस्कार धन बनले आहे. त्याबद्दल लेखिका भगिनींचे अभिनंदन! या पुस्तकामुळे नवी पिढी, नवे व्यक्तिमत्त्व अधिक समाजशील, संस्कारी, संवेदी, अधिकारापेक्षा कर्तव्यपरायण होईल, असा मला विश्वास वाटतो.

◼◼


दि. १९ मार्च, २००७
गुढीपाडवा

प्रशस्ती/५२