पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/52

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पुस्तक मागील शतकात जन्मलेल्या मुलांसाठी (सन १९९० नंतर जन्मलेल्या) असले तरी ते एकविसाव्या शतकात जगणा-यांसाठी आहे. त्यामुळे उदाहरणे केवळ इतिहास, वेद, पुराणातील न देता ते अधिक परिणामकारक ठरले असते. काही ठिकाणी अशी उदाहरणे आहेत; पण ती अधिक असणे उचित ठरले असते. हा एक अपवाद वगळता सदरचे पुस्तक हे अभ्यासक्रम सापेक्ष झाले आहे, हे मान्य करायलाच हवे.

 ‘व्यक्तिमत्त्व विकासाची सूत्रे' मध्ये लेखिकांनी ‘मूल्य शिक्षण प्रकरणात मूल्य व संस्कारांचे महत्त्व विशद केले आहे. नीटनेटकेपणा, संवेदनशीलता, वक्तशीरपणा, स्त्री-पुरुष समानता, सौजन्यशीलता यांसारख्या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करणारे हे पुस्तक मूल्याधिष्ठित मनुष्य विकासाचा आग्रह धरते. दुस-या प्रकरणात करण्यात आलेला तणाव व्यवस्थापनाचा विचार कालसंगत वाटतो. संघर्ष व गतीचं तणाव हे अपत्य असतं. ते सांभाळायला व्यवस्थापनावर विचार करणे अनिवार्य असते. व्यक्तिमत्त्व संतुलित व संयमित राहायचं तर तणाव ही प्रक्रिया काय असते? तणाव कशामुळे निर्माण होतात? त्यांची वर्तनव्यवहारी लक्षणे कोणती? दूर करायचे उपाय कोणते याचा ऊहापोह विविध आकृत्यांद्वारे केल्याने तणावासारखा क्लिष्ट विषय सरस व सुकर होण्यास साहाय्य झाले आहे. काळ बदलतो तसा शिक्षणाचे स्वरूपही बदलते. पूर्वी अक्षर नि अंक ज्ञान म्हणजे शिक्षण होतं. गेल्या शतकात व्यावसायिक शिक्षणाचे महत्त्व वाढले ते जगाच्या व्यापारीकरण नि औद्योगिकीकरणाने. आज व्यक्तिमत्त्व विकास हेच शिक्षणाचे ध्येय नि उद्दिष्ट ठरते आहे. जगायला शिकवणारे शिक्षणच खरे. व्यावसायिक कौशल्य विकासावर सविस्तर माहिती देऊन पुस्तक उपयोगी कसे होईल, हे पाहिले आहे. मानव अधिकार संरक्षणासारखा अत्यंत नवीन; परंतु आवश्यक होऊ पाहणारा विषय अंतर्भूत झाल्याने पुस्तकाच्या विषयास पूर्णत्व प्राप्त झाले आहे. हे शतक मानवाधिकारांचे राहणार यात तिळमात्र शंका नाही. नव्या विद्याथ्र्यांत अधिकार साक्षरता येईल, तरच ते कर्तव्यतत्पर राहतील, असा होरा ठेवून अंतर्भूत केलेले हे। प्रकरण पुस्तकास नावीन्यपूर्ण व अत्याधुनिक विचारसरणीचे समर्थक बनवते. भ्रष्टाचार शिष्टाचार होऊ पाहात असलेल्या समाज संक्रमण काळात जर आपण विद्यार्थ्यांत त्याविषयी घृणा निर्माण करू शकलो, तर भारत सन २०२० पर्यंत मूल्याधारिक महासत्ताक देश बनल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचे प्रणेते अण्णा हजारे, कर्तव्यतत्पर व प्रामाणिक पोलीस अधिकारी डॉ. किरण बेदी, सेवापरायण मदर तेरेसा,

प्रशस्ती/५१