पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/51

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

लागल्याने कायदा, संस्कार, सचोटी याची त्यास चाड राहिलेली नाही. रोज कायदा हातात घेण्याची वृत्ती नवा दहशतवाद रुजवू पाहते आहे. मनुष्य समाजाचे वर्तन आणि व्यवहार यादवीकडे कूच करताना दिसतात. माणूस आपल्या हक्कांबद्दल जितका जागृत असतो, तितका तो कर्तव्य परायण, कार्यतत्पर असत नाही. त्याला दुस-याच्या डोळ्यांतलं कुसळ जितकं प्रकर्षाने दिसतं, तितकं स्वतःच्या डोळ्यात मुसळ असलं तरी न दिसणं, न जाणवणं हे केवळ दृष्टिमांद्य नसून वृत्तीमाजही आहे. असं माणसाचं ‘झापड जगणं' हे या शतकापुढचं खरं आव्हान आहे. ते पेलायचं, पचवायचं असेल तर माणसाचं ‘माणूस' होणं महत्त्वाचं ठरतं. त्यासाठी त्याच्या व्यक्तिमत्त्वाची घडण ही नव्या अंगांनी व नव्या घटकांवर आधारित होणं आज आवश्यक होऊन बसलं आहे. हे पुस्तक त्या दिशेनं केलेला एक जाणीवपूर्वक लेखन प्रपंच होय.

 सदर क्रमिक पुस्तकाच्या लेखनात लेखिकद्वयांनी पूर्वतयारी, नियोजन, वाचन, मनन, संदर्भ संकलन, मांडणी अशा अनेक अंगांनी पूर्व विचार केल्याचे हे पुस्तक वाचताना लक्षात येते. सुमारे १00 पृष्ठांच्या या ग्रंथात व्यक्तिमत्त्व विकासाची षड्सूत्रे निरुपित करण्यात आली आहेत. मूल्यशिक्षण, तणाव व्यवस्थापन, व्यावसायिक शिक्षण, मानव अधिकार संरक्षण, भ्रष्टाचार निर्मूलन, दहशतवाद प्रतिबंध व आपत्ती व्यवस्थापनासारख्या अत्याधुनिक संकल्पनांच्या आधारे व्यक्तिमत्त्व विकासाची मांडणी केली आहे. प्रत्येकासाठी स्वतंत्र प्रकरण करण्यात येऊन विषयाधिष्ठता सांभाळली आहे. प्रत्येक प्रकरणाच्या प्रारंभी संक्षिप्त मुद्दे दिले आहेत. आशयाचा विस्तार मर्मग्राहीपणे करण्यात आला आहे. प्रकरणाच्या शेवटी स्वाध्याय देऊन अभ्यासक्रमाचा उद्देश कृतिप्रवण करण्याचा प्रयत्न अनुकरणीय होय. आशयाची मांडणी उपशीर्षके देऊन मुद्देसूद करण्यात आली आहे. नववीच्या मुलांचा वयोगट लक्षात घेऊन करण्यात आलेली पुस्तक रचना, भाषा प्रयोग खासच उजवे झाले आहेत. छोट्या-छोट्या वाक्यांमुळे आशय व विषय दोन्ही सुबोध व सुलभ झालेत. हे या पुस्तकाचं खरं बलस्थान, आवश्यक तेवढेच मुद्यांचे विवेचन झाल्याने नेमकेपणा व नेटकेपणांनी हा ग्रंथ नटला आहे. विषय समजावताना लेखिकांनी केलेला हितगुज शैलीचा प्रयोग यामुळे या पुस्तकास संवाद नि समुपदेशनाचे (Dialogue and Counselling) स्वरूप प्राप्त झाले आहे. विषयातील आशय वा तथ्य समजाविण्यासाठी जागोजागी उदाहरणे, गोष्टी दिल्या आहेत. त्यामुळे विषयरूक्षता कमी होऊन आशय रंजकपणे विद्याथ्र्यांच्या मनी-मानसी, हृदयी पोहोचेल, याची मला खात्री वाटते. हे

प्रशस्ती/५०