पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/50

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

व्यक्तिमत्त्व विकासाची सूत्रे (क्रमिक पुस्तक)

डॉ. लता पाटील व सौ. सुलोचना भागाजे

प्रणव प्रकाशन, कोल्हापूर \ प्रकाशन - एप्रिल, २००७

पृष्ठे - १०९ किंमत - ६0/



'माणूस' घडणीची सूक्ते


 ‘व्यक्तिमत्त्व विकासाची सूत्रे हे इयत्ता नववीसाठी लिहिलेलं मार्गदर्शक असं क्रमिक पुस्तक होय. लेखिका डॉ. लता पाटील व सौ. सुलोचना भागाजे यांनी ते संयुक्तपणे लिहिलं आहे. ते नव्या अभ्यासक्रमावर आधारित असून शैक्षणिक वर्ष २00६-२००७ पासून अभ्यासक्रमात समाविष्ट आहे. त्याचा लाभ महाराष्ट्रभरच्या विद्यार्थी व शिक्षकांना होईल. हे पुस्तक व्यक्तिमत्त्व विकासास समर्पित असलं, तरी ते मानवाच्या 'माणूस' म्हणून घडण्यास उपयुक्त ठरेल.

 आजचं समाजजीवन विलक्षण संघर्षाचं झालं आहे. माणसास हरघडी अस्तित्वाची लढाई खेळणं अनिवार्य होऊन बसलं आहे. वाहतुकीच्या वाढत्या सोयी-सुविधा, वाहनांची रोज वाढणारी गती यामुळे माणसाची स्पर्धा प्रकाशाच्या गतीशी होते आहे. संगणक व माहिती-तंत्रज्ञानाच्या विकासामुळे व विशेषतः महाजालीय विस्तारामुळे (इंटरनेट) ज्ञानाला क्षितिज राहिलं नाही. जगाचं खेडं बनणं, अवकाश कवेत येणं, निसर्गाच्या रोज नव्या गूढाचं निराकरण होणं, विज्ञानाचे पराकाष्ठेचे शोध यांमुळे माणसाचं जीणं नि जीवन एकीकडे सुखकर, तर दुसरीकडे गुंतागुंतीचं होऊ लागलंय. गती, संघर्ष, समृद्धी, अस्तित्व स्पर्धा, जागतिकीकरण यामुळे जगण्याचे ताण वाढत आहेत. माणूस मूल्यांपेक्षा मालमत्तेस महत्त्व देऊ

प्रशस्ती/४९