पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/5

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

माझ्या वेळोवेळी लिहिलेल्या प्रस्तावना वाचल्या होत्या नि एका प्रस्तावनेच्या निमित्ताने ते फोनवर दीर्घकाळ बोलत राहिले नि प्रस्तावना संग्रह का आवश्यक ते त्यांनी मला पटवून सांगितले होते. त्याची फलश्रुती म्हणजे हा प्रशस्ती' प्रस्तावना शिर्षक होय.
 गेल्या तीस वर्षांत मी कथा, कादंबरी, भाषणसंग्रह, काव्यसंग्रह, आत्मकथन, बालकविता, वैचारिक, लेखसंग्रह, सत्यकथा, स्मारक ग्रंथ, चरित्रे, चरित्रमाला, दैनंदिनी, समीक्षासंग्रह, संशोधन प्रबंध, आठवणी, ललित लेखसंग्रह, मार्गदर्शिका, अनुभवकथन, भाषांतर, अग्रलेख संग्रह, सौंदर्यशास्त्र, विनोदी लेखसंग्रह अशा विविध साहित्यरूप, कृतींना प्रस्तावना लिहिल्या. काहींना शुभेच्छा अभिप्राय लिहिले. काही पुस्तकांचे मलपृष्ठ मजकूर लिहून समृद्ध केले. या निमित्ताने माझ्यातला वाचक, विचारक, समीक्षक समृद्ध होत गेला. प्रस्तावना लिहायची म्हणून आलेला मजकूर मुद्रणपूर्व रूपात असतो. ब-याचदा ते हस्तलिखित असतं, कधी टंकित प्रत तर कधी तरल प्रत (सॉफ्ट कॉपी) ई-मेलवरूनही येत असते. तशी ती सर्वार्थाने अशुद्ध, असमृद्ध प्रत हाती असते. प्रस्तावना मात्र शुद्ध, समृद्ध अपेक्षित असते. लेखक, लेखिकांच्या लेखी झटपट प्रस्तावना म्हणजे ‘यादी पे शादी' किंवा 'झट मँगनी, पट शादी' असाच सारा व्यवहार असतो. जर ते त्या लेखक, लेखिकेचे पहिले पुस्तक असेल तर मग विचारूच नका. त्याला प्रस्तावनाकार म्हणजे त्याच्या प्रस्तावनेसाठीच जन्मलेला प्राणी वाटत असतो. शिवाय याला प्रस्तावना लिहिण्याशिवाय दुसरा कोणता उद्योग नसावा असा समज असल्याने त्यांच्या जिभेवरचा तीळ भिजायच्या आत प्रस्तावना हवी असते. हे अबोधपण, ही अधीरता नवलेखक म्हणून स्वाभाविकच म्हणायला हवी.
 मराठी साहित्य, समीक्षेच्या प्रांतात प्रस्तावनेच्या अनुषंगाने विपुल लेखन झालेले आहे. वि. स. खांडेकर आपल्या साहित्य कृतींना आवर्जून प्रस्तावना लिहीत. त्या ब-याचदा विस्तृत असत, संक्षिप्त प्रस्तावना अपवाद! शिवाय त्यांनी अन्यांच्या पन्नास एक पुस्तकांना लिहिलेल्या प्रस्तावना मी संदर्भासाठी वाचल्या आहेत. शिवाय त्यांचे पुस्तक करायचे संकल्पित असल्याने त्या संग्रहीपण आहेत. कुसुमाग्रजांनी वि. स. खांडेकरांनी स्वतःच्या पुस्तकांना लिहिलेल्या प्रस्तावनांचा एक संग्रह संपादित केला असून तो ‘विचारधारा' शीर्षकाने प्रकाशित झाला आहे. तोही संग्रही आहे, वाचला आहे. वि. ग. कानिटकर संपादित 'गाजलेल्या प्रस्तावना बहुचर्चित आहे. अनिल सहस्त्राबुद्धे लिखित ‘प्रस्तावना : संकल्पना व स्वरूप' मध्ये