पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/45

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शिकवत असताना त्यांच्या विद्यार्थ्यांचे वाचनदोष त्यांच्या लक्षात आले. या दोषांमुळे त्यांच्यातील अस्वस्थ शिक्षकाचे बेचैन होणे स्वाभाविकच म्हणायला हवे. त्यातून त्यांनी प्रयोग, धडपड, चाचण्या घेतल्या व जे निष्कर्ष आपल्या हाती आले ते कृतिसंशोधनाच्या रूपात आपल्यापुढे मांडले. काही संशोधन करायचे म्हणून त्यांनी वाचन ही समस्या शोधली नाही तर समस्येतून संशोधनाकडे असा त्यांचा झालेला प्रवास हेच या पुस्तकाचे खरे बलस्थान आहे.

 लेखकाने ‘जलद व प्रभावी वाचन' ग्रंथ प्रशिक्षण व स्वयंअध्ययन अशा दोन अंगांनी, उद्देशांनी लिहिला आहे. यातील प्रशिक्षणाचा पैलू शिक्षक, वाचकांशी संबंधित आहे, तर स्वयंअध्ययन हे कुणाही वाचकाला स्वतःचा वाचनवेग, वाचनदोष, आकलन इ. अंगाने स्वतःचे वाचन कौशल्य विकसित करण्यास उपयोगी सिद्ध होईल. या दृष्टीने हे पुस्तक एकीकडे ‘वाचनासंबंधी शिक्षक हस्तपुस्तिका जशी आहे तशी ती वाचकांसाठी ‘स्वयं मार्गदर्शिका' म्हणूनही उपयुक्त झाली आहे.

 या पुस्तकात वाचनाच्या विविध अंगांचा ऊहापोह करणारी अकरा प्रकरणे आहेत. बारावे प्रकरण ‘अभ्यास करा करावा' या विषयाला वाहिलेले आहे. माणूस वाचन का करतो यावर लेखन कलेचा विकास झाल्यापासून अनेकांनी लिहिले आहे. परंतु वाचनासंबंधी संशोधनात्मक लेखन हे गेल्या शतकात झाले. वाचन, आकलन व अभ्यास या तीन स्वतंत्र शैक्षणिक प्रक्रिया होत. त्यांचा संबंध शरीरशास्त्र व मानसशास्त्राशी आहे. वाचन ही मन व शरीराच्या समन्वयातून होणारी कृती आहे. आकलन ही विशुद्ध मनोवैज्ञानिक प्रक्रिया आहे तर अभ्यासाचा संबंध उपयोजनांशी आहे. हे सर्व वाचनप्रक्रिया, वाचनवेग, वाचनदोष, प्रभावी वाचनाचे उपाय, आकलन कौशल्य वृद्धी इत्यादी अंगांनी लेखकाने सविस्तर मांडणी करून या ग्रंथाद्वारे समजाविले आहे. त्याचा प्रत्यय यावा म्हणून अनेक चाचण्या दिल्या आहेत. शेवटी उत्तरे देऊन हा ग्रंथप्रपंच प्रमाणित Standard केला आहे.

 वाचन प्रक्रियेची वैज्ञानिक मांडणी ही या ग्रंथाची मोठी जमेची बाजू होय. वाचन हे भाषिक कौशल्य होय. ते प्रयत्नपूर्वक विकसित करता येते. वाचनाचा वेग असतो. तो प्रयत्नाने वाढविता येतो. वाचनाचा नि दृष्टीचा, वाचनाचा नि मनाचा संबंध असतो. प्रत्येकाच्या डोळ्याचा नि मनाचा आवाका भिन्न असल्याने वाचन कौशल्य भिन्न होते, याची जाण हे पुस्तक देते. केवळ वाचन म्हणजे शिक्षण नव्हते. जोवर वाचनाचा संबंध आकलनाशी जोडला जात नाही तोवर शिक्षण होत नाही. केवळ वाचन हे मात्र मनोरंजन

प्रशस्ती/४४