पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/40

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

परिचित झालेली आहे. माझी ‘घडण' हा केवळ माझा पुरुषार्थ नाही, या साच्या घडणीत माझे आप्त, आत्मीय आद्यप्रेरक, समाजाचे आजीव सेवक, या सर्वांचा वाटा आहे, अशी कृतज्ञ भावना उरात घेऊन जगणाच्या 'वास्तव'च्या लेखकास आपल्या सभोवारची माणसं ऋणभार वाटतात. उतराईच्या भावनेतून लिहिलेल्या 'वास्तव'मधील शब्दचित्रांना भावचित्रांचे रूप येते. ते लेखकाच्या अंतःस्फूर्त कृतज्ञतेमुळे! 'वास्तव' या शब्दचित्र संग्रहातील काही व्यक्ती समाजपुरुष आहेत तर काही सामान्य असून असामान्यत्व धारण करणाच्या व्यक्ती आणि समाज जीवनाची सुंदर गुंफण करत लिहिलेल्या या व्यक्तिचित्रांमध्ये वाचकांना जगण्याची प्रेरणा प्रेरणाबळ देण्याची विलक्षण शक्ती आहे!

 लेखकाने ही व्यक्तिचित्रे उतराईच्या भावनेने लिहिली असली, तरी त्यात समाज शिक्षण, समाज प्रबोधनाची ताकद दिसून येते. 'वास्तव' आहे, दातृत्व, समाजसेवा, दलितोद्धार, शिक्षण विकास, शिक्षण प्रसार, माणुसकी, भूतदया, जगण्याची ऊर्मी, जीवनांची झुंज शिकविणा-या व्यक्तिचित्र संग्रह. लेखकास या सा-याचा निकट संपर्क संस्कार लाभला. त्यामुळे आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याचा कृतकृत्य भाव लेखकाचे मनी आहे. हा भाव वाचकांपर्यंत पोहचविताना तो समाजात कृतज्ञतेचं पाझर जिवंत राहावेत म्हणून धडपडत असल्याचे लक्षात येते.

 भारतीय शिक्षण व नियोजन क्षेत्रांतील अग्रगण्य पद्मभूषण डॉ. जे. पी. नाईक, विना अनुदान शिक्षण संस्कृतीचे प्रसारक पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील, आधुनिक कर्ण बनून समाजसेवकांचा संसार चालविणारे कै. प्रभाकरपंत कोरगावकर, अनाथांचा नाथ कै. अमरनाथ कांबळे, दीनदलितांचे कैवारी दलित मित्र बापूसाहेब पाटील, राजर्षी शाह महाराजांचे लोकोत्तर कार्य सामान्यप्रत पोहचविणारे व शाहशाहीर बिरुदावलीस पात्र ठरलेले माजी आमदार कै. पी. बी. साळुखे अशी एकीकडे समाजपुरुषांची मांदियाळी या 'वास्तव'मध्ये आहे. तर दुसरीकडे आप्तस्वकीयांतील आपणास मोठे करणाच्या भावाबहिणीस स्थान देऊन त्यांचं स्थान व्यक्तिगत जीवनांत वरील समाजपुरुषाइतकंच महत्त्वाचं असल्याचं स्पष्ट केलं आहे!

 प्राचार्य अरविंद सातवेकरांची जडणघडण गारगोटीच्या श्री मौनी विद्यापीठात झाली. सेवानिवृत्तीनंतर लेखक कोरगावकर ट्रस्टच्या सान्निध्यांत आले. त्या आधी पद्मभूषण डॉ. जे. पी. नाईक यांचे सान्निध्य लाभलेले त्यांचे जीवन फिनिक्स पक्ष्याप्रमाणे तरारले. डॉ. जे. पी. नाईक हे केवळ शिक्षणतज्ज्ञ, नियोजक नव्हते. तर माणसाची विलक्षण पारख असलेले

प्रशस्ती/३९