पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/37

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पचवतात कारण या संस्थात्मक रौरवातही त्यांना रेणूसारखी ओअॅसिस गवसतात. आईच्या शोधासच कुलूप लावू मागणारी मुलं-मुली आपलं घर निर्माण करून समाजाचा विधायक प्रतिशोध घेतात. 'डेव्हिड ससूनचे दिवस' मध्ये तुम्हास भेटणारे विजय, महेंद्र, सत्य, सुनील, नारायण, मुन्ना, अर्जुन, नूर, दिनेश, पुंडलीक, भैरव महाराष्ट्रातील प्रतिवर्षी रिमांड होममध्ये शेकडोंच्या संख्येने दाखल होणाच्या मुला-मुलींचे प्रतिनिधी आहेत. इथं फक्त मुलांच्याच कथा लिहिल्या गेल्यात. सन १९८० ते २000 या कालखंडात मी महाराष्ट्रभरच्या अशा संस्थांतील मुली-महिलांचं जे जिणं पाहिलं, अनुभवलं आहे ते खचितच या मुलांचं जीवन फिकं, सुसह्य वाटावं असं भयंकर होतं.

 स्वातंत्र्याच्या सत्तावन्न वर्षांच्या प्रवासात महाराष्ट्र शासनास एकाही सरकारी रिमांड होमची इमारत बांधता आली नाही. यावरून हे कल्याणकारी राज्य ‘ही तर श्रींची इच्छा' म्हणूनच चालतं याची प्रचिती येते. ज्यांना मतं नसतात त्यांना राजकारणात महत्त्व असत नाही. अनाथ, निराधारांना अजून संस्थांत नावांऐवजी नंबर' असतात. संस्थेच्या लेखी ती एक ‘फाईल असते. पोलीस ठाण्याच्या लेखी ती 'वर्दी' असते तर समाजविज्ञान संस्थांना ती एक 'केस स्टडी' असते. महाराष्ट्र हे छत्रपती शाहू, म. फुले, डॉ. आंबेडकरांचं पुरोगामी राज्य असल्याने संस्थेतील मुलांना अजून नाव, गाव, शिक्षण, नोकरी सर्वांपासून वंचित राहावं लागतं. त्यांना आरक्षण, प्राधान्य द्यावं असं आपणास एकविसाव्या शतकात येऊनही वाटत नाही यासारखा या समाजाचा, शासनाचा नाकर्तेपणा तो दुसरा कोणता? असा प्रश्न ‘आमचा काय गुन्हा?' वाचताना माझ्या मनात निर्माण झाला. तो तुमच्याही मनात निर्माण झाला तर ते या पुस्तकाचं यश समजावं.

 रेणू गावस्कर यांनी डेव्हिड ससूनमध्ये केलेले प्रयोग मी प्रासंगिकपणे संस्थेत न जाता सर्ववेळ काम करून केले आहेत. त्यामुळे रेणू गावस्कर यांना डेव्हिड ससूनची तटबंदी किलकिली करताना काय यातायात सहन करावी लागली आहे याची कल्पना आहे. हे कार्य प्रासंगिक पाझरांचं नाही. संस्थांतील मुलांसाठी करायचं तर तुमचा मातृत्वाचा झरा अखंड झरत राहायला हवा. हे काम मोठ्या धीराचं, धैर्याचं नि संयमाचं! रेणू गावस्कर काही अनाथ नव्हत्या की उन्मार्गी. त्यांना या मुलांसाठी इतकं भरभरून करावंसं वाटावं याचं सारं श्रेय त्यांनी जपलेल्या माणुसकीच्या गहिवरासच द्यावं लागेल.

प्रशस्ती/३६