पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/35

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

इतकं बेचैन केलं की त्या संस्थेचा तो तुरुंगी दिंडी दरवाजा किलकिला करून प्रवेश करत्या झाल्या नि त्यांच्यापुढे उभं राहिलं ते बालपण हरवलेल्यांचं एक उद्ध्वस्त जग!

असं नसतं की, अनाथाश्रम, रिमांड होम, महिलाश्रम, वृद्धाश्रम, बंदिस्त संस्थांतील मुलं, मुली, महिलांतच उद्ध्वस्तपण, रितेपण असतं. भरल्या घरातही मी अनेक माणसं उद्ध्वस्तपण अनुभवत जगत असताना पाहिलीत. रेणू गावस्करांच्या जाणिवांनी त्यांना या संस्थेकडे ओढलं. मग रोजच्या जाण्यायेण्यातून त्यांना समजलं की ही मुलं प्रेमाची भुकेली आहेत. त्यांना आपणाशी कुणीतरी प्रेमानं वागावं असं वाटतं. त्यांना आपुलकीची मोठी भूक. तिकडे संस्थेतील अधिकारी कर्मचा-यांच्या लेखी ही मुलं म्हणजे बनेल, बनचुके, चोर, बदमाश! ‘लातों के भूत, बातों से नहीं मानते!' असा त्यांचा पक्का समज. सारा दिनक्रम म्हणजे हाताची घडी तोंडावर बोट. ज्या वयात खेळायचं, बागडायचं त्या वयात चोवीस तास गजाआड जेरबंद! नाही म्हणायला खेळापुरता रिकामा श्वास! हे सारं पाहून रेणू गावस्कर हादरतात... हे जीवन त्यांच्या कल्पनेपलीकडचं असतं. सारंच हरवलं, गमावलेल्या या अश्राप मुलांसाठी काही करावं असं त्यांना वाटलं. त्या नियमित तास-दोन तास डेव्हिड ससूनमध्ये जाऊ लागतात. मुलांना गोष्टी सांग, नाटक बसव, बोलतं कर, प्रेमाची पाखर घाल. त्या मुलांशी मोकळेपणानं जिवाभावाचं बोलत राहतात. अनेक निमित्ताने उंचउंच भिंतीमुळे समाजापासून तुटलेल्या बेटाप्रमाणे राहणा-या या संस्थेत समाजातील समाजसेवक, स्वयंसेवक, अभिनेते, उद्योगपती, देणगीदार, धनिक, संवेदनशील तरुण-तरुणींना संस्थेत नेत संस्थेचा बंदिस्तपणा संवेदनक्षम सातत्याने मोडीत काढतात. या साच्या धडपडीत एक-एक दिवस मागे पडत कधी गेले ते कळलेच नाही. त्या दिवसांच्या धडपडीची कहाणी आहे ‘आमचा काय गुन्हा?'

 रेणू गावस्कर ह्या व्यासंगी वाचक आहेत. देशी-परदेशी साहित्याची त्यांना चांगली जाण आहे. त्यांनी जॉर्ज ऑर्वेलचा ‘एरिक ब्लेअर', चार्ल्स डिकन्सचा ‘डेव्हिड कॉपरफिल्ड', ख्रिश्चन अँडरसन्सचा ‘द मॅच ग्रिल' मधील हॅन्स, मार्क ट्रेनच्या 'द प्रिन्स अँड द पॉपर' मधील टॉम पॉपर व राजपुत्र एडवर्ड वाचला आहे. साने गुरुजी, अनंत काणेकर, आशापूर्णा देवी यांचं बालसाहित्य त्या जाणतात. त्यांच्या मुलांविषयीच्या या करुणाष्टकांचं रहस्य या साहित्यात सामावलेलं आहे. 'आमचा काय गुन्हा?' समजून घ्यायचे तर मराठीत वंचित साहित्याची मोठी परंपरा डोळ्याखालून घालावी

प्रशस्ती/३४