पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/30

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ही त्यांच्या संवेदनशीलतेचीच पावती असते. एकविसावं शतक हे आत्मकेंद्री शतक! अशा काळात त्यांचं अनाथाश्रम, रिमांड होम, तुरुंगासारख्या तटबंद संस्थांत डोकावणं 'कोंडलेल्या हुंदक्यांना वाट करून देणं ठरतं. हे हुंदके ऐकायला, समजायला मात्र पाझरणाऱ्या हृदयाची गरज आहे खरी. वाचक ते सजगतेनं पचवतील अशी आशा आहे.

 मराठी साहित्यात कोंडलेले हंदके' ऐकू येण्याची, ऐकवण्याची परंपरा जुनी आहे. ‘उपेक्षितांचे अंतरंग' लिहून प्रा. श्री. म. माटे यांनी गावकुसाबाहेरचं जग दाखवलं. पुढे दलित साहित्याचा एक वेगळा प्रवाह महाराष्ट्रात निर्माण झाला. त्यात डॉ. शरणकुमार लिंबाळेचं ‘अक्करमाशी', 'डॉ. किशोर शांताबाई काळे यांचं ‘कोल्हाट्याचं पोर' या कृतींनी अनौरस संततीच्या वेदना जागवल्या. अलीकडच्या काळात अरुण खोरे यांनी ‘पोरके दिवस' लिहून संस्थातील लाभार्थीच्या पोरकेपणावर बोट ठेवलं. हे पुस्तक डॉ. दामोदर खडसे यांनी ‘भूले बिसरे दिन' या नावाने हिंदीत अनुवादितही केलं आहे. सौ. इंदुमती जोंधळे यांनी आपल्या ‘बिनपटाची चौकट' द्वारे निराधार मुलांची व वाताहत झालेल्या कुटुंबाची कथा शब्दबद्ध केली आहे. त्यांच्या आत्मकथेचा अनुवाद डॉ. शशिप्रभा जैन यांनी केला असून तो प्रकाशनच्या प्रतीक्षेत आहे. या दोन्ही आत्मकथा शिवाजी विद्यापीठाच्या एम. ए. च्या अभ्यासक्रमात पाठ्यपुस्तके म्हणून अभ्यासल्या गेल्या. त्यांना अनेक पुरस्कार लाभले. या पुरस्कारांनी त्यांच्या हुंदक्यांचे मोती झाले. अलीकडेच या ओळी लिहिणाऱ्यानेही ‘खाली जमीन वर आकाश' लिहून ही परंपरा वर्धिष्णू करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा समावेश लेखिकेने यातील एक हुंदक्याच्या रुपात केलाही आहे. १९९२-९३ च्या सुमारास दैनिक सकाळच्या उत्तर महाराष्ट्र (नाशिक) आवृत्तीतून प्रदीप निफाडकरांनी ‘आभाळ पेलताना सदर चालवून संस्थातील अनाथ, निराधार व्यक्तींचं जिणं शब्दबद्ध केलं होतं. अशा पार्श्वभूमीवर मराठी समाज, वाचक अनाथ, निराधारांच्या जीवनाविषयी सजग होत असतानाच्या काळात लेखिकेनं लिहिलेलं सदर कोंडलेले हुंदके वंचित विश्वाच्या प्रकाश वाटेवरील एक असा दीप म्हणून पुढे येतं की, ज्यामुळे समाजमन भावसाक्षर होईल. बिकट वाट सुलभ करण्याच्या उद्देशाने केलेल्या या लेखनाचं असाधारण असं सामाजिक मूल्य आहे.

 ‘कोंडलेले हुंदके अनाथांच्या सत्यकथा आहेत. लेखिकेने लाभार्थीना प्रत्यक्ष भेटून, त्यांच्याशी संवाद साधून, त्यांच्याशी हितगुज करून केलेलं लेखन आहे. हे कष्टप्रद कार्य त्यांनी अनाथांची दया करण्याकरता केलेलं

प्रशस्ती/२९