पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/271

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

जीवन हातातून निसटून केव्हा जातं कळत नाही. उरतो तो पश्चात्ताप! त्याला इलाज नसतो नि उताराही! सोसणं, मौन, असह्य जगणं ही नव्या स्त्रीची जुनी कहाणी नि पुराणी गाणी या कवितेत एकेकटी भेटत राहातात व वाचकही मग हताश, निराश, असाह्य होत राहतो. मग कामगार भेटतो... त्यांचा पुढारी मार्क्स भेटतो. पण तत्त्वज्ञानाने जीवन जगता येतं, सरत नसतं हे शल्य कवयित्रीचं असलं तरी ते एका अर्थाने जगण्याची इच्छा असणा-या सा-यांचं समान आत्मकथनच होतं.


 ‘एकटी कविता' स्त्री मनाचा उद्गार म्हणून वाचली पाहिजे. एकविसाव्या शतकाचं पहिलं दशक मागं पडलं तरी विसाव्या शतकाचे भोग संपत नाहीत, याचं भान देणारी ही कविता तिच्या साध्या, भोळ्या शब्दकळेतही सुंदरपणे जीवनाचं विकट रूप चित्रित करते. तिला ललित किनार नसेल, पण भावनेच्या भक्कम कोंदणात ती माळावरच्या मळवटासारखी जीवनाचं रांगडं रूप रेखाटते.

◼◼


दि. ८ जानेवारी, २०१३


प्रशस्ती/२०६